सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव महामार्गालगत सेवारस्त्याचे सदोष कॉंक्रिटीकरण

जळगाव महामार्गाच्या मजबुतीकरणात सेवारस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सदोष होत आहे. रस्त्यापेक्षा पाच फूट उंच गटारांमुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.

जळगाव महामार्गालगत सेवारस्त्याचे सदोष कॉंक्रिटीकरण

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अवघ्या एक-दोन वर्षांतच रस्त्याची अवस्था खालावली. दोष दायित्वाचा कालावधी संपण्यापूर्वीच महामार्गासह सेवारस्त्यांच्या मजबुतीकरणाची गरज निर्माण झाली. मात्र, सध्या सुरू असलेले कॉंक्रिटीकरणही पूर्वीच्या कामाप्रमाणेच सदोष होत असल्याच्या तक्रारी नागरिक आणि तज्ज्ञांकडून येऊ लागल्या आहेत.

गटार रस्त्यापेक्षा उंचावर

एकलव्य क्रीडा संकुलाजवळ महामार्गालगतच्या सेवारस्त्याला लागून गटाराचे काम सुरू आहे. काही ठिकाणी गटार रस्त्यापेक्षा चार ते पाच फूट उंच आहे. रस्त्यावरील पाणी गटारात जावे यासाठी ठराविक अंतरावर अडीच इंचांच्या पाइपद्वारे छिद्रे सोडण्यात आली आहेत, पण अनेक ठिकाणी ती सोडलेलीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून राहण्याची भीती आहे. अग्रवाल हॉस्पिटल चौकात पावसाळ्यात आधीपासूनच पाणी साचते; तिथेही गटार रस्त्यापेक्षा उंचावर बांधले जात आहे. काही ठिकाणी गटारात टाकलेला पाइप रस्त्यापेक्षा सुमारे फूटभर उंच असल्याने पाणी गटारात जाणारच नाही, अशी स्थिती आहे.

समांतर रस्त्याकडे जाण्याचा मार्गच बंद

आयटीआयसमोर सेवारस्त्याचे कॉंक्रिटीकरण आणि गटाराचे काम सुरू आहे. मात्र, मध्येच उंच गटार आल्याने महामार्गावरून समांतर रस्त्यावर जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आयटीआयसमोरून जाणारा समांतर रस्ता वाहनधारकांना उपयोगी पडणार नाही. तिथे खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण आणि ठिय्या आज आहे तसाच कायम राहील, अशी भीती व्यक्त होत आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांमुळे चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विस्तृत प्रकल्प अहवालापासून काम पूर्ण होईपर्यंत नियोजनातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाचे काम समोर आले. संपूर्ण कामाची रचनाच चुकीच्या अभियांत्रिकीचे उदाहरण ठरली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मजबुतीकरणाचे काम सुरू असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे या सदोष कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. चुकीचे काम आढळून आल्यावर ते दुरुस्त करण्याची तसदीही यंत्रणा घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मजबुतीकरणानंतरही जळगावकरांना महामार्गावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance