बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवारी गेवराई तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी उपोषण सुरू केले. गेल्या सात महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तातडीने मिळावे आणि त्याचा एफटीओ त्वरित काढावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. मानधनाअभावी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने त्यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
## सात महिन्यांचे मानधन थकीत
गेवराई पंचायत समिती अंतर्गत एकूण १२७ ग्रामरोजगार सहाय्यक कार्यरत आहेत. त्यांचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सहा महिने आणि मार्च २०२६ चा एक महिना, असे एकूण सात महिन्यांचे मानधन अद्याप थकीत आहे. थकीत मानधनाचा एफटीओ काढण्याबाबत संबंधित गटविकास अधिकारी आणि नरेगा विभागाला वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वेळेवर मानधन न मिळाल्याने ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले.
## मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
अखेर नाइलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसत कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. या आंदोलनात संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष तुकाराम गवारे, उपाध्यक्ष महादेव कादे, सचिव रमेश जाधव यांच्यासह बहुसंख्य ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी झाले आहेत.
Leave a Reply