छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेला एक धक्कादायक प्रसंग नुकताच सांगितला आहे. रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेल्या देबिनाने अभिनेत्री मनीषा राणीच्या पॉडकास्टमध्ये हा अनुभव उघड केला. त्या प्रसंगामुळे ती प्रचंड घाबरली होती, असे तिने सांगितले.
मनोरंजन क्षेत्रात झगमगाट, प्रसिद्धी आणि पैसा दिसत असला तरी या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अनेक कलाकारांना वेगवेगळ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. विशेषतः करिअरच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्रींना अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. देबिनाच्या बाबतीतही असाच एक प्रसंग घडला होता.
संध्याकाळी सोबत येण्याचे निमंत्रण
देबिनाने सांगितले की, त्या काळात ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत होती. एका दिग्दर्शकाने तिला संध्याकाळी आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्यावेळी देबिना खूप लहान होती आणि अशा परिस्थितीत स्पष्टपणे नकार कसा द्यायचा, हेही तिला माहीत नव्हते. दिग्दर्शक गाडी चालवत असताना तिला काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव होत होती. तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते.
त्यानंतर अचानक त्याने एका अंधाऱ्या ठिकाणी गाडी थांबवली आणि तिला किस करण्यास सांगितले. त्याची ही मागणी ऐकून देबिना पूर्णपणे हादरली. तिला प्रचंड भीती वाटत होती. हा माणूस आपल्याला मारून टाकेल की काय, असे विचार तिच्या मनात येत होते. ती अक्षरशः थरथर कापत होती.
धैर्य दाखवत दिला नकार
मात्र, देबिनाने धैर्य दाखवले आणि आपण या गोष्टीसाठी सहज नसल्याचे त्या दिग्दर्शकाला स्पष्टपणे सांगितले. तिच्या मते, त्या वयात अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याची पुरेशी समज नव्हती. त्यामुळे हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता.
देबिनाने पुढे सांगितले की, गुरमीत चौधरी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिला खऱ्या अर्थाने सुरक्षिततेची भावना मिळाली. दोघांनी रामायण मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत गुरमीतने प्रभू श्रीरामांची, तर देबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. मालिकेतील ही जोडी पुढे खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकली. आज हे दोघे दोन मुलींचे आई-बाबा आहेत.
Leave a Reply