मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाई गंभीर; २९८ टॅंकरने पाणीपुरवठा

अहिल्यानगर जिल्ह्यातील २५९ गावे आणि १ हजार ५६३ वाड्यांतील ५ लाख २८ हजार नागरिकांना २९८ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात असून पाणीटंचाई सध्या गंभीर बनली आहे.

अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाई गंभीर; २९८ टॅंकरने पाणीपुरवठा

अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील २५९ गावे आणि १ हजार ५६३ वाड्यांना तब्बल २९८ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून ५ लाख २८ हजार १६३ नागरिकांची तहान भागविली जात आहे. यंदा जनावरांनाही टॅंकरने पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात पाऊस नसल्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्वाधिक झळा दक्षिण जिल्ह्यातील तसेच शास्वत आणि धरण अथवा कालव्याचे पाणी नसलेल्या पाथर्डी, जामखेड आणि अहिल्यानगर तालुक्यातील काही भागाला बसत आहे. एकट्या पाथर्डी तालुक्यात सुमारे पावणे दोन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

तालुकानिहाय टॅंकरची संख्या

कर्जत तालुक्यात ७८ हजार ७४४, शेवगाव तालुक्यात ६७ हजार ९६, जामखेड तालुक्यात ३९ हजार ११६, पारनेर तालुक्यात ४१ हजार ४०४, संगमनेर तालुक्यात २० हजार २६४, श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार २६३ आणि नेवासा तालुक्यात ५ हजार ४९८ नागरिकांना टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. शेवगाव, कर्जत, पाथर्डी आणि पारनेर या शहरांमध्येही टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पारनेर शहर आणि लगतच्या भागातील १३ हजार ११९ नागरिकांना टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. पाथर्डी शहर व परिसरातील २५ वाड्यांसाठी तीन टॅंकरव्दारे सुमारे पाच हजार नागरिकांना पाणी दिले जात आहे. कर्जत शहर आणि लगतच्या १९ वाड्यांतील ५ हजार ४००, तर शेवगाव शहर व परिसरातील १७ वाड्यांतील २ हजार ६३० नागरिकांची तहान पाच टॅंकरव्दारे भागविली जात आहे.

टॅंकरची तालुकानिहाय संख्या अशी आहे — पाथर्डी १००, कर्जत ३९, अहिल्यानगर ३५, शेवगाव ४१, जामखेड ३१, पारनेर १९, संगमनेर १३, श्रीगोंदा ५, नेवासा २ आणि पारनेर शहर १३. जिल्हा प्रशासनाकडून ३७ विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance