घर बांधताना किंवा घराचे नूतनीकरण करताना अनेकजण प्रत्येक खोलीसोबत बाथरूमलाही लाकडी दरवाजा बसवतात. पण काही दिवसांनी हाच दरवाजा डोकेदुखी ठरू शकतो. बाथरूममध्ये सतत पाण्याचे शिंतोडे उडतात आणि ओलावाही कायम असतो. त्यामुळे लाकडी दरवाजा खालच्या बाजूने खराब होऊ लागतो. तसंच त्याला वाळवी लागण्याची शक्यताही वाढते. ही समस्या टाळायची असेल तर बाथरूमसाठी लाकडी दरवाजाऐवजी इतर पर्याय निवडणं फायदेशीर ठरू शकतं. इंटिरिअर तज्ज्ञांनी यासाठी डब्ल्यूपीसी, यूपीव्हीसी, अॅल्युमिनियम आणि स्टील अशा दरवाजांचे पर्याय सुचवले आहेत.
डब्ल्यूपीसी दरवाजा ठरेल चांगला पर्याय
सध्या बाथरूमसाठी डब्ल्यूपीसी म्हणजेच वुड प्लास्टिक कंपोझिटपासून बनवलेल्या दरवाजांना पसंती दिली जात आहे. हे दरवाजे दिसायला लाकडासारखे असतात. त्यामुळे घराच्या सजावटीला छान आणि महागडा लुक मिळतो. या दरवाजांचा फायदा म्हणजे पाण्यामुळे ते लगेच खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना वाळवी लागण्याची भीतीही नसते. तुमच्या बजेटनुसार यामध्ये स्वस्त आणि महागडे असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी खर्चात चांगला दरवाजा हवा असेल तर डब्ल्यूपीसीचा विचार करू शकता.
यूपीव्हीसी, अॅल्युमिनियम आणि स्टीलचे दरवाजे
घराच्या खिडक्यांसाठी तुम्ही यूपीव्हीसी किंवा अॅल्युमिनियमचा वापर केला असेल, तर बाथरूमसाठीही याच प्रकारचा दरवाजा बसवू शकता. हे दरवाजे मजबूत असतात आणि बराच काळ टिकतात. पाणी किंवा ओलाव्यामुळे ते सहज खराब होत नाहीत. याशिवाय लाकडाप्रमाणे ते फुगत नाहीत आणि त्यांना गंजण्याचा धोकाही नसतो. या दरवाजांची स्वच्छता आणि देखभाल करणंही सोपं असतं. तुमचं बजेट चांगलं असेल आणि तुम्हाला खूप वर्षे टिकणारा दरवाजा हवा असेल तर स्टीलचा दरवाजा निवडू शकता. स्टीलचे दरवाजे मजबूत आणि टिकाऊ असतात. पाणी, ओलावा आणि बदलत्या हवामानाचा त्यांच्यावर सहज परिणाम होत नाही. त्यामुळे वारंवार दरवाजा बदलण्याची गरज पडत नाही. एकदा चांगल्या दर्जाचा स्टीलचा दरवाजा बसवला तर तो अनेक वर्षे वापरता येऊ शकतो.
दिसायला लाकडासारखे, पण डिझाइनमध्येही सुंदर
अनेकांना असं वाटतं की लाकडी दरवाजाऐवजी दुसऱ्या साहित्याचा दरवाजा बसवला तर तो घराच्या सजावटीला शोभणार नाही. पण आता तसं नाहीये. डब्ल्यूपीसी, यूपीव्हीसी आणि स्टीलचे दरवाजेही वेगवेगळ्या आधुनिक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये लाकडासारखा रंग आणि आकर्षक फिनिशिंग मिळतं. त्यामुळे घराच्या सजावटीशी जुळणारा दरवाजा निवडता येतो. घर बांधताना बाथरूमच्या दरवाजाची निवड करताना थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण दरवाजा बसवल्यानंतर काही दिवसांतच तो खराब झाला तर पुन्हा खर्च करावा लागू शकतो. योग्य दरवाजा निवडल्यास तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचू शकतात.
Leave a Reply