कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
रोह्यात संध्याकाळी पक्षप्रवेश सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या रोह्यात शिवसेना आज राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि तटकरे कुटुंबाचे निकटवर्तीय प्रमोद म्हसकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत संध्याकाळी रोहा शहरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
म्हसकरांचा राजीनामा आणि सामाजिक कार्य
काही दिवसांपूर्वी प्रमोद म्हसकर यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रोहा, पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात म्हसकर यांचा संपर्क असून या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे राजकीय संकेत आहेत.
महायुतीतील वाद विकोपाला
दरम्यान, रायगडमध्ये सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वाद उफाळला आहे. रायगडमधील या दोन्ही पक्षातील राजकीय वाद दिवसेंदिवस विकोपाला चालला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यासह इतर नेत्यांकडून सतत टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. नुकताच भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला होता. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
Leave a Reply