महिला प्रीमियर लीगच्या (WPL) 2027 च्या हंगामातील मुंबईतील सामन्यांच्या ठिकाणात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबईत होणारे सर्व 11 सामने आता ब्रेबोर्न स्टेडियमऐवजी वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी, 15 नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. सामन्यांच्या तारखा आणि वेळापत्रकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या निर्णयामुळे प्रथमच वानखेडे स्टेडियमला WPL सामन्यांचे यजमानपद मिळणार आहे. यापूर्वी मुंबईतील सर्व सामने ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार होते.
महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे मैदानात बदल
14 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत ब्रेबोर्न स्टेडियम आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. WPL संपल्यानंतर लगेचच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार असल्याने ब्रेबोर्नवरील खेळपट्टी पुन्हा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. आयसीसीच्या नियमानुसार स्पर्धा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी संबंधित मैदानाचा पूर्ण ताबा आयसीसीकडे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीने ब्रेबोर्नवरील WPL सामने अन्यत्र हलवण्याची विनंती केली होती. त्यानंतर WPL समितीने या बदलाला मंजुरी दिली.
वानखेडेवर मुंबईतील सर्व 11 सामने
WPL 2027 च्या मुंबई टप्प्यातील एकूण 11 सामने आता वानखेडे स्टेडियमवर होतील. यामध्ये साखळी फेरीतील 12व्या ते 20व्या सामन्यांसह एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. हे सामने 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत.
स्पर्धेच्या नव्या हंगामाला 14 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दोन वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल. 24 जानेवारीपर्यंत वडोदरा येथे पहिले 11 सामने खेळवले जातील आणि त्यानंतर स्पर्धा मुंबईत दाखल होईल. साखळी फेरीतील सामने 3 फेब्रुवारीला संपतील, 5 फेब्रुवारीला एलिमिनेटर होईल आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात थेट प्रवेश करेल. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.
Leave a Reply