उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी असले तरी भाजप आणि समाजवादी पार्टीने राजकीय तयारी सुरू केली आहे. अशातच व्होट वाईबचा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीमध्ये फारसा फरक दिसत नसल्याने आगामी निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
सर्व्हेत कोणत्या पक्षाला सर्वाधिक पसंती?
व्होट वाईबच्या सर्व्हेनुसार, २०२७ मध्ये मतदान झाल्यास भाजप आघाडीला ४१.९ टक्के मतदारांची पसंती मिळू शकते. तर समाजवादी पार्टीच्या आघाडीला ३९.१ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. दोन्ही आघाड्यांमधील मतांचा फरक अवघ्या २.८ टक्क्यांचा आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल, असे चित्र सर्व्हेतून समोर येत आहे. दुसरीकडे बसपाला ६.४ टक्के आणि इतर पक्षांना ४.९ टक्के पसंती मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे ७.८ टक्के मतदारांनी अद्याप कोणाला मतदान करायचे हे ठरवलेले नाही.
शहरात भाजप मजबूत, ग्रामीण भागात अटीतटीची लढत
या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांचा कलही समोर आला आहे. शहरी मतदारांमध्ये भाजपची पकड मजबूत असल्याचे दिसते. मात्र ग्रामीण भागात भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात भाजप मजबूत असल्याचा अंदाज आहे. तर अवध क्षेत्रात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची पकड चांगली असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. पूर्वांचल आणि बुंदेलखंडमध्ये मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
ओबीसी आणि दलित मतदार कोणाला साथ देणार?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात जातीय समीकरणांना मोठे महत्त्व आहे. यादव मतदारांचा कल समाजवादी पार्टीकडे, तर बिगर यादव ओबीसी मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे सर्व्हेत नमूद आहे. दलित मतदारांमध्ये जाटव समाजाचा कल मायावतींच्या बसपाकडे, तर बिगर जाटव मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे चित्र आहे. सामान्य प्रवर्गातील ६६ टक्के मतदार भाजपला पसंती देत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
२०२२ मध्ये भाजपने मारली होती बाजी
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २५५ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. मित्रपक्षांसह भाजप आघाडीने २७३ जागांवर विजय मिळवला होता. समाजवादी पार्टीला १११ जागा मिळाल्या होत्या. आता २०२७ मध्ये हे चित्र बदलणार की भाजप पुन्हा सत्ता राखणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मात्र सध्याच्या सर्व्हेनुसार दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
Leave a Reply