दिवाळीच्या सुटीत कुटुंबीय बाहेरगावी असताना जळगावच्या श्यामनगरात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन घरे फोडली. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेत तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घरमालक बाहेरगावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
जळगाव शहराला लागून असलेल्या गिरणा पंपींग रोडवरील श्यामनगरात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडून ऐवज लंपास केला. घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडण्यासाठी चोरट्यांनी कटरचा वापर केल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. कुलूप आणि कडीकोयंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटांचे लॉकर उघडून त्यातील ऐवज घेऊन ते पसार झाले.
एक कुटुंब परतले, दोन अजून गावी
चोरट्यांनी फोडलेल्या तीन घरांपैकी एक कुटुंब रविवारी सायंकाळी घरी परतले. त्यांच्या घरातून दहा हजार रुपयांची रोकड गेल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. अन्य दोन कुटुंबीय अद्याप गावीच असून ते सोमवारी परतणार आहेत. त्यानंतरच किती ऐवज चोरीला गेला, हे स्पष्ट होणार आहे.
सीसीटीव्हीत कैद, शिट्टी वाजल्याने पळाले
तिन्ही घरे फोडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सुरुवातीला दोन चोरटे दरवाजाचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ त्यांचा एक साथीदार तेथे येतो आणि तिघे घरात प्रवेश करताना, त्यानंतर एका पाठोपाठ बाहेर पडताना दिसत आहेत.
तीन घरे फोडल्याची घटना ज्या गल्लीत घडली, त्या गल्लीतच निवृत्त पोलिस उपनिरीक्षक जगदीश बोरनारे वास्तव्यास आहेत. पहाटे त्यांना काही आवाज आल्याने ते उठले आणि त्यांनी शिट्टी वाजविली. तो आवाज ऐकून चोरटे पळून गेले. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात न आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
टोपी-मास्क घालून आलेले चोरटे
तिन्ही चोरट्यांनी खास प्रकारची टोपी आणि मास्क लावले होते, जेणेकरून सीसीटीव्हीत चित्रीत झाले तरी ओळख पटू नये. तिघांच्या पाठीवर कॉलेज सॅग, हातात मोजे आणि बॅटरी होत्या.
जिल्हा न्यायालयात कार्यरत किरण वासेवाये यांच्या घरात दागिन्यांसह मोठी रक्कम चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने अद्याप नेमका ऐवज काय आणि किती गेला, हे कळू शकलेले नाही. वासेवाये यांच्या शेजारीच छायाचित्रकार महेश जगन्नाथ पाथरकर यांचे घर फोडण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून ते मलकापूरला गेले होते. त्यांच्या घरातून कपाटातून आठ ते दहा हजारांची रोकड गेल्याचे त्यांनी सांगितले. टीव्हीही काढून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. वरील दोन्ही घरांच्या पुढील गल्लीतील तोफिक तडवी किनगावकर यांच्या घराचाही कडीकोयंडा कापून चोरी करण्यात आली. त्यात त्यांच्या घरातील टीव्ही चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. कालच ते घरबंद करून गावाला गेले आहेत.
Leave a Reply