बागलाण तालुक्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची कामे करणाऱ्या शेकडो ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. देयके अडकून पडल्याने तालुक्यातील विकासकामांना खीळ बसली असून, ठेकेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
बागलाण तालुक्यात रस्ते, पूल आणि सार्वजनिक पाणीपुरवठा तसेच जलजीवन योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे, घरकुले आणि जलजीवन प्राधिकरणाची कामे शेकडो ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र, देयके मिळत नसल्याने या कामांना आता ग्रहण लागले आहे.
साडेतीनशे कोटींचा निधी प्रलंबित
बागलाण तालुक्यासाठी टी ६ अंतर्गत सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तालुक्यात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती. अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींकडे साकडे घातल्यानंतर निधी उपलब्ध नसतानाही विकासकामे मार्गी लावण्यात आली होती. मात्र, आता देयके न मिळाल्याने ठेकेदार, कामगार आणि संबंधित यंत्रणांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जलजीवनची कामेही ठप्प
जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटिंगची सुमारे ४० कोटी रुपयांची कामे पूर्ण होऊनही गेल्या दोन वर्षांपासून संबंधित निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जलजीवनची कामे ठप्प झाली असून तालुक्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रलंबित निधीचे तातडीने वितरण करावे, अशी मागणी नामपूरचे ठेकेदार सूरज देवरे यांनी केली आहे.
Leave a Reply