जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रविवारी जनजातीय गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. खासदार स्मिता वाघ, शहराचे आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विकासाचा अर्थ केवळ भौतिक सुविधा नव्हे
केवळ रस्ते आणि पूल बांधणे म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नव्हे, तर त्यासाठी वैचारिक प्रगल्भताही तितकीच गरजेची असल्याचे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. केंद्र आणि राज्य शासन आदिवासी बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. मात्र या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सुशिक्षित नागरिक आणि युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बिरसा मुंडांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा
भगवान बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी दिलेला लढा, त्यांचे क्रांतिकारी कार्य आणि सर्वोच्च बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. त्यांच्या संघर्षातून तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना आणि प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. खासदार स्मिता वाघ यांनी आदिवासी समाजाच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला.
कार्यक्रमात पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला दहा हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचाही सन्मान झाला. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालय परिसरात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित चित्रमय फलक आणि आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहरातून रॅलीही काढण्यात आली. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले, हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.
Leave a Reply