छत्रपती संभाजीनगरमधील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर विमानसेवाही वाढविण्याचा मुद्दा आता उद्योग क्षेत्रातूनही ठळकपणे मांडला जात आहे. एथर एनर्जीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांनी शहरातील अपुऱ्या विमानसेवेचा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केल्यानंतर औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) वतीने इंडिगो एअरलाइन्सच्या गुरुग्राम मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडे विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.
एक लाख ३० हजार कोटींची गुंतवणूक; प्रवासाची मागणी वाढणार
देशात विमानांची संख्या वाढविण्याची गरज मांडतानाच मेहता यांनी छत्रपती संभाजीनगरचे उदाहरण दिले होते. शहरात एथर एनर्जीच्या नव्या प्रकल्पासह अनेक उद्योग येत असताना अधिक विमानफेऱ्यांसाठी स्थानिक उद्योग संघटनांना इंडिगोकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याची विसंगती त्यांनी अधोरेखित केली होती. विमानसेवा अपुरी असल्याने नाशिकसारख्या जवळच्या शहरातून रस्तेमार्गे प्रवास करण्याची वेळ येत असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर एटीडीएफच्या नागरी विमान वाहतूक समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांची सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक सुरू असून, अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या प्रगत टप्प्यात आहेत. त्यामुळे आगामी काळात व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबई, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद मार्गांवर अधिक फेऱ्यांची मागणी
विमानसेवा वाढविण्याची मागणी आता केवळ पर्यटन क्षेत्र किंवा एटीडीएफपुरती मर्यादित राहिलेली नसून, उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाकडूनही ती पुढे येत आहे. ही बाब विमान कंपन्यांनी गांभीर्याने घ्यावी, असे कोठारी यांनी म्हटले आहे. इंडिगोने शहराची वाढती औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षमता लक्षात घेऊन मुंबई, बंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या मार्गांवर विमान फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. औद्योगिक विकास झाल्यानंतर विमानसेवा वाढविण्यापेक्षा विकासाला चालना देण्यासाठी आधीच पुरेशी हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विमानसेवेतील वाढ ही प्रादेशिक औद्योगिक आणि आर्थिक विकासाला पूरक ठरेल, अशी भूमिका एटीडीएफतर्फे सुनीत कोठारी यांनी मांडली आहे.
Leave a Reply