मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा विद्यावेतन मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही विद्यावेतन वेळेवर जमा होत नसल्याने आता डॉक्टरांनी थेट ‘भीक मांगो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.
१० ते १५ तारखेदरम्यान विद्यावेतन
रुग्णालयातील सुमारे २२५ निवासी डॉक्टरांना दरमहा ९० हजार रुपयांहून अधिक विद्यावेतन मिळते. मात्र हे विद्यावेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळण्याऐवजी साधारणपणे १० ते १५ तारखेदरम्यान जमा होत असल्याची तक्रार डॉक्टरांनी केली आहे. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या कूपर शाखेचे अध्यक्ष डॉ. मयूर चौधरी यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. निवासी डॉक्टरांच्या सेवांवर संपूर्ण रुग्णालयाची रुग्णसेवा अवलंबून असताना त्यांचेच विद्यावेतन वेळेवर का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यावेतन उशिरा मिळाल्याने घरखर्च, कर्जाचे मासिक हप्ते आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विलंबाचे कारण आणि पुढील पाऊल
लिपिक वर्गाला विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामासाठी वळवण्यात आल्याने विद्यावेतन वितरणास विलंब होत असल्याचे कारण डॉक्टरांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. मात्र अन्य अधिकारी आणि प्राध्यापकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच जमा होत असल्याने केवळ निवासी डॉक्टरांनाच विलंब का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रश्नावर पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने दिवाळीनंतर पालिका आयुक्तांकडे हा मुद्दा मांडण्याची तयारी संघटनेने केली आहे. विद्यावेतन नियमितपणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
Leave a Reply