लातूर शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेल्या दुभाजकांना अक्षरश: कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. येता-जाता नागरिकांकडून येथे कचरा फेकला जात असल्याने ठिकठिकाणच्या दुभाजकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक मार्गावरील दुभाजक स्वच्छ करून आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनमधील पर्यावरणप्रेमींनी रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी तब्बल आठ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा बाहेर काढला.
१७० वी स्वच्छता मोहीम
आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी शहरात १७० वी स्वच्छता मोहीम गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक भागात राबवली. या भागातील दुभाजकांमध्ये अनेक महिन्यांपासून स्वच्छता झालेली नाही, असे आढळून आले. येथील कचऱ्याचे फोटो काढून प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून काहीही कारवाई न झाल्यामुळे फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वतःच या भागात स्वच्छता मोहीम राबवली.
साडेतीन तासांत आठ ट्रॅक्टर कचरा
या दुभाजकांमध्ये परिसरातील ऑटोमोबाइल दुकानदारांनी भंगार साहित्य, आजूबाजूच्या घरातील लोकांनी कॅरीबॅगमध्ये बांधून घरातील खरकटे अन्नधान्य, प्लॅस्टिक बाटल्या, दिवाळी पूजनाचे साहित्य, केळीची पाने, नारळाची पाने, बांधकामाचे साहित्य, तुटलेले फर्निचर, घरातील शिल्लक साहित्य आणि कुजलेले अन्न असा कचरा टाकला होता. फाउंडेशनमधील १५ सदस्यांनी हा कचरा बाहेर काढून दुभाजक स्वच्छ केले. रविवारी जवळपास साडेतीन तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत अंदाजे आठ ट्रॅक्टर केरकचरा, भंगार साहित्य आणि प्लॅस्टिक जमा झाले, अशी माहिती फाउंडेशनचे डॉ. पवन लड्डा यांनी दिली. या मोहिमेसाठी डॉ. पवन लड्डा, दयाराम सुडे, रवी तोंडारे, सुवर्णा महाजन, डॉ. संगीता शिंदे, किरण चिंते, संस्कृती पिसाळ, डॉ. ज्योतीराम पिसाळ, ओमप्रकाश शेळके आणि आकाश पेठकर यांच्यासह अन्य सदस्यांनी पुढाकार घेतला होता. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि कचरा घंटागाडीमध्येच टाकावा, असे आवाहन दयाराम सुडे यांनी केले आहे. घंटागाडी येत नसेल तर संबंधित अधिकारी किंवा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply