हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जलसंकटाची तीव्रता वाढू लागली आहे. भूजलपातळीत जवळपास तीन मीटरने घट झाल्याने विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलही कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी नोव्हेंबर महिन्यातच कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईचे भीषण चित्र समोर आले आहे.
पावसाची मोठी तूट
हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी १४४.२ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा मात्र ऑक्टोबरअखेर सरासरीच्या तुलनेत ६९.९ टक्के पावसाची नोंद झाली. पावसाची मोठी तूट राहिल्याने अनेक भागांत पावसाळा संपतानाच विहिरींनी तळ गाठला आणि बोअरवेल कोरडे पडले. दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कयाधू नदीपात्रातील बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. यंदा मात्र संपूर्ण पात्र कोरडे पडले आहे.
१५४ गावांची भिस्त नदीवर
कयाधू नदीचा उगम रिसोड तालुक्यातून होतो. त्यानंतर ही नदी सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी या तीन तालुक्यांतून सुमारे ९९ किलोमीटरचा प्रवास करते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १५४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या नदीवर परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी भिस्त आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच नदीपात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणी आणि सिंचनावर होण्याची शक्यता आहे.
दहा उच्च पातळी बंधाऱ्यांची प्रतीक्षा
कयाधू नदीवर ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने नदीपात्रात पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही. परिणामी, बंधारे असूनही पाणी टिकून राहिले नाही. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने जलसाठ्यांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कयाधू नदीवर दहा उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून, त्यांचे सर्वेक्षणही झाले आहे. बेलवाडी, खरबी, गडगीळवाडी, नर्सी नामदेव, ब्रह्मपुरी, कारेगाव, वरूड चक्रपान, कवठा पूल, कोंडवाडा आणि कहाकर येथे बंधारे उभारण्यात येणार आहेत. मात्र, या बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया थंड बस्त्यात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उच्च पातळीचे बंधारे आणि नदीपात्राचे खोलीकरण झाल्यास नदी हिवाळ्यात कोरडी पडणार नाही.
Leave a Reply