सातारा शहराच्या पश्चिम भागातील रहिवाशांना लवकरच पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. महादरे, मोरे कॉलनी, केसरकर कॉलनी आणि हद्दवाढीनंतर पालिकेत समाविष्ट झालेल्या परिसरासह व्यंकटपुरा पेठेच्या काही भागात तांत्रिक कारणांमुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना रोजच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या भागासाठी पाच लाख लिटर क्षमतेची नवी साठवण टाकी उभारण्यात येणार आहे. या टाकीला कास तलावातून येणाऱ्या पाण्याची वाहिनी जोडण्यात येणार आहे.
तीन दिवसांतून एकदा पाणी
हद्दवाढीनंतर महादरेसह लगतचा भाग पालिकेत आला. या भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असून पाण्याची मागणीही वाढत आहे. मागणीनुसार पाणीपुरवठा करताना यंत्रणेवर ताण येत आहे. सध्या या भागांना समाधीचा माळ परिसरातील योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. जीवन प्राधिकरणाकडून या योजनेला मिळणारे पाणी मर्यादित असल्याने काही भागांना तीन दिवसांतून एकदा पाणी मिळते. याबाबतच्या तक्रारी नागरिक नगरसेविका मुक्ता लेवे यांच्याकडे नोंदवत होते. त्यांच्या मागणीची दखल घेत लेवे यांनी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार पालिकेने या भागासाठी नव्याने पाच लाख लिटरची साठवण व वितरण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
कास तलावातून पाणी येणार
नव्याने बांधण्यात येणाऱ्या टाकीला कास योजनेतून येणारे पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आगामी काळात मुबलक पाणी मिळणे शक्य होणार आहे. या कामासाठीचे अंदाजपत्रक तसेच इतर तांत्रिक प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली असून यासाठी लागणारा निधी पंधराव्या वित्त आयोगातून किंवा इतर शासकीय योजनेतून मिळवला जाणार आहे.
सद्यस्थितीत पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र तसेच मुख्य वाहिनीवरून व्यंकटपुरा पेठेसह काही भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यात तांत्रिक बिघाड झाल्यास या भागाचा पाणीपुरवठा ठप्प होतो. नवीन टाकीमुळे साठवण आणि वितरण ही दोन्ही कामे करणे शक्य होणार आहे. महादरेसह विस्तारित भागातील नागरिकांची पाण्यासाठी मोठी परवड होत असून ती टाळण्यासाठी आणि समाधीचा माळ पाणी योजनेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही साठवण व वितरण टाकी महादरे परिसरात उभारण्यात येत असल्याचे नगरसेविका मुक्ता लेवे यांनी सांगितले.
Leave a Reply