जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि महाराष्ट्रासह आदिवासी भागातील विविध सुविधांचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलानाकडून प्रेरणा घेत नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याचे त्यांनी सांगितले. माओवाद देशातून संपल्याची घोषणा त्यांनी केली. जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला देत पन्नास कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा देत भगवान बिरसा मुंडा यांना वंदन केले.
नक्षलवाद संपल्याची घोषणा
भगवान बिरसा मुंडा यांचे उलगुलान आपल्यासाठी प्रेरणा आहे. आपण बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊ या, असे पंतप्रधान म्हणाले. आधी असे दिन परकीय व्यक्तीशी जोडले जायचे, आता आपल्या व्यक्तींशी निगडित दिन साजरा होत आहे. आपण आज मिझोरमपासून सर्व देशभरात विविध सुविधांचे लोकार्पण झाले. देशभरातील वेगवेगळ्या भागात आदिवासी वीरांनी आंदोलनाला दिशा दिली. पन्नास कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले, हे आपले यश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील एकशे पंचवीस जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी हातपाय पसरले होते. आदिवासी संकटात असताना तत्कालीन सरकारे मौन बाळगून होती. पण आता नक्षलवाद आणि माओवाद संपल्याचे त्यांनी सांगितले. हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे यश असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. गडचिरोली नव्हे, तर सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यांत नक्षलवादाने आदिवासींचे नुकसान केले. अल्पवयीन मुलांना चळवळीत नेले जायचे. आज नक्षलवाद संपला, तेव्हा आया बहिणी आम्हाला आशीर्वाद देत आहेत. मी यंदा बस्तरमध्ये दिवाळी साजरी केली, ही नवी सुरुवात आहे, असे मोदी म्हणाले.
आदिवासी विकासाची कामे
आम्ही गेले बारा वर्षे आदिवासी विकासासाठी परिणामकारक योजना राबविल्या, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही चार कोटी पक्की घरे बनविली. आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजना दिल्या आणि राबवल्या. आदिवासी समाजासाठी प्रगतीची दारे उघडली, असे पंतप्रधान म्हणाले. गडचिरोलीत जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री, राज्याचे आदिवासी मंत्री, जिल्ह्यातील आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी विविध आदिवासी भागातील विकास योजनांची माहिती यावेळी दिली.
Leave a Reply