लोकप्रिय कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शुक्रवारी नेटफ्लिक्सवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या हंगामाचा एक भाग प्रदर्शित झाला. त्या भागात स्पर्धक सलमा दिवाणी हिच्यासोबतच्या संवादादरम्यान समयने केलेल्या एका टिप्पणीवरून हा वाद निर्माण झाला आहे.
कार्यक्रमात समयने सलमाला तिच्यासोबत कोण आले आहे, असे विचारले. त्यावर सलमा म्हणाली की, मुंबईत ती एकटी आली आहे, मात्र कार्यक्रमात ती चुलत भावासोबत आली आहे. त्यावर पॅनेलमध्ये बसलेल्या हुमा कुरेशी यांनी कोणता चुलत भाऊ, असे विचारले असता समय म्हणाला, ‘नवरा असेल.’ या संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी समयवर टीका केली आहे. सलमा दिवाणी हिचे खरे नाव भाग्यश्री तार्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
मौलाना खलील रहमान नूरी यांचा आक्षेप
‘ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा’चे सचिव मौलाना खलील रहमान नूरी यांनी या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते हे वक्तव्य नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. कोणी कोणासोबत आले, ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब असून, ती पतीसोबत किंवा इतर कोणासोबत आली होती, असा दावा करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा वक्तव्यांमुळे वातावरण बिघडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मौलाना पुढे म्हणाले की, एफआयआर दाखल झाल्यामुळे विरोध अधिक टोकाला जाऊ शकतो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आधी वादग्रस्त विधान करायचे, मग खटल्याला सामोरे जायचे, माफी मागायची आणि शेवटी प्रकरण मिटवायचे, असा एक मार्ग आता ठरला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पहिल्यांदाच वाद नाही
समय रैना वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या हंगामातही त्याच्यावरून वाद झाला होता. तेव्हा रणवीर इलाहाबादिया यांनी एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांबद्दल असे काही विचारले होते, जे अनेकांना आवडले नाही. त्यावेळी समयवर एफआयआरही दाखल करण्यात आला होता. आता नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
Leave a Reply