नोकरदारांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कापली जाते आणि ती ईपीएफओच्या निधीत जमा होते. निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळेल, अशी अपेक्षा प्रत्येक कर्मचाऱ्याची असते. मात्र नियमित कपात होत असूनही अनेक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना मासिक पेन्शन मिळत नाही. याचे कारण ईपीएफओच्या नियमांमध्ये दडलेले आहे.
बऱ्याच कर्मचाऱ्यांना ही बाब आधी माहितच नसते. निवृत्तीनंतर ते पेन्शन मिळवण्यासाठी ईपीएफओ कार्यालयाच्या फेऱ्या मारतात आणि तेव्हा पेन्शन मिळणार नसल्याचे कळल्यावर त्यांना मोठा धक्का बसतो. ईपीएफओच्या अटी पूर्ण झाल्याशिवाय पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. कोणत्या अटींमुळे कर्मचाऱ्यांना फटका बसतो, ते पाहू.
दहा वर्षांची नोकरी पूर्ण होणे आवश्यक
ईपीएफओच्या नियमानुसार पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी किमान दहा वर्षांची नोकरी पूर्ण करणे गरजेचे आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची एकूण नोकरी दहा वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला पेन्शन मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी फॉर्म 10C भरून आपली रक्कम काढू शकतो.
मूळ वेतनाची मर्यादा
जर एखादा नवीन कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 रोजी किंवा त्यानंतर ईपीएफओशी जोडला गेला असेल आणि त्याचे सुरुवातीचे मूळ वेतन महिन्याला 25,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याला ईपीएस सदस्य मानले जात नाही. अशा प्रकरणात कंपनी आणि कर्मचारी परस्पर सहमतीने केवळ पीएफची रक्कम कापून त्यावर 8.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकतात. मात्र त्यांना पेन्शनचा लाभ घेता येत नाही.
वय आणि रक्कम काढण्याचा परिणाम
58 वर्षांनंतर पेन्शन निधीत पैसे जमा होणे थांबते आणि त्या टप्प्यावर पेन्शनचा हक्क मिळतो. मात्र दहा वर्षांची नोकरी पूर्ण होण्यापूर्वी पेन्शनची रक्कम काढली, तर मासिक पेन्शनचा लाभ मिळत नाही. दहा वर्षांपेक्षा कमी, म्हणजे नऊ वर्षे सहा महिन्यांची नोकरी पूर्ण झाली असेल, तरी पेन्शन खात्यातून एकरक्कमी रक्कम काढता येत नाही, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळाची आणि वेतनाची स्थिती लक्षात घेऊन ईपीएफओचे नियम आधीच समजून घेणे गरजेचे आहे.
Leave a Reply