धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर येथील लाटीपाडा धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी पिंपळनेरच्या सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे चौफुलीच्या चारही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने साक्री तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामाला फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर आहेत. गहू, हरभरा आणि कांदा यांसह अन्य पिकांच्या लागवडीसाठी तसेच उभ्या पिकांना वाचविण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
लेखी आदेशाशिवाय माघार नाही
लाटीपाडा धरणातून पाणी सोडण्याचा अधिकृत लेखी आदेश द्यावा, आवर्तनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि शेतीपंपांचा खंडित वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले. केवळ तोंडी आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही हवी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
चार आवर्तने देऊनही पाणी शिल्लक होते
यापूर्वी लाटीपाडा धरणातून दरवर्षी चार आवर्तने दिल्यानंतरही पाणीसाठा शिल्लक राहत होता. मग यंदा रब्बीसाठी पाणी सोडण्यास टाळाटाळ का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना शेतकरी दत्तात्रय शंकर दाभाडे यांना अचानक चक्कर आल्याने ते घटनास्थळी कोसळले. उपस्थितांनी तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रसाद रौदळ, पीएसआय मोरे आणि पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता. पाण्याबाबत तातडीने लेखी निर्णय घेऊन प्रत्यक्ष आवर्तन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Leave a Reply