दिवाळी हंगामातील सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळ बहरले असून देशविदेशातील पर्यटकांची पावले या गिरिस्थानाकडे वळली आहेत. प्रसिद्ध वेण्णा लेक नौकाविहारासह प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य तसेच गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच रेलचेल आहे. वेण्णा लेक परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून नौकाविहारासाठी रांगा लागत आहेत.
महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक विविध हंगामात भेट देतात. मे महिन्याचा मुख्य उन्हाळी हंगाम संपल्यावर पावसाळ्यातील काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर रंगरंगोटी आणि स्वच्छतेच्या कामांसाठी महाबळेश्वरकर दिवाळी हंगामाच्या तयारीला लागतात. यंदाही दसऱ्याआधी स्वच्छतेची कामे, रंगरंगोटी आणि सजावटीची कामे पूर्णत्वास गेली. आता दिवाळी हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेलसह दुकानदार सज्ज झाले होते.
देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली असून विशेषतः दिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य पाहण्यात आणि अनुभवण्यात मग्न झाले आहेत. पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
वेण्णा लेकपासून प्रतापगडापर्यंत पर्यटनस्थळे गजबजली
येथील पर्यटनास प्रसिद्ध असलेले केट्स पॉइंट, महाबळेश्वरची शान असलेला आर्थर सीट पॉइंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, शहरापासून जवळच असलेला सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंट आणि लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे गर्दीने गजबजून गेली आहेत.
महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागत असून थंड आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करताना पाहायला मिळत आहेत. येथील मुख्य बाजारपेठा पर्यटकांच्या स्वागतासाठी सजल्या असून पर्यटक हमखास विंडो शॉपिंगसाठी येतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, थंडगार गोळा आणि प्रसिद्ध फज खरेदीसाठी गर्दी होत आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी उबदार ब्लॅंकेट, कानटोपी आणि मफलर खरेदीसाठीही गर्दी होत आहे. बाजारपेठेतील आकर्षक वस्तूंच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल असून खाद्यपदार्थांवरही पर्यटक ताव मारत आहेत.
पाचगणी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर प्रत्येक हंगामाप्रमाणेच या हंगामातही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत असून स्थानिकही वैतागले आहेत. स्थानिक प्रशासनाने समन्वयाने या कोंडीवर मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Leave a Reply