फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. सुरुवातीला फक्त चीनमध्येच फेंग शुईला मान्यता होती. मात्र, त्यानंतर हळूहळू फेंग शुईचा प्रसार जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये झाला. आज अनेक देशांमध्ये फेंग शुईमधील उपाय केले जातात. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, ते पैसा प्रचंड कमावतात. दिवस-रात्र मेहनत करतात. परंतु, त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. खर्चाचे प्रमाण जास्त असते. खर्चाला आळा बसावा आणि हातात आलेला पैसा टिकावा, यासाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
फेंग शुईनुसार या उपायांमुळे तुमच्या हातात आलेल्या पैशांची बचत तर होईलच, परंतु त्याचबरोबर चुंबकाप्रमाणे पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होईल, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे.
पाकिटात काय ठेवू नये?
फेंग शुईनुसार तुमच्या खिशात असलेले तुमचे पैशांचे पाकिट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये कोणत्या वस्तू ठेवता, याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर पडत असतो. त्यामुळे पाकिटात कधीही धारदार वस्तू, फाटलेल्या नोटा, तसेच चलनात नसलेले जुने नाणे आणि पूर्वजांचे फोटो अशा गोष्टी चुकूनही ठेवू नयेत, असे फेंग शुईमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच तुमचे पाकिट हे कधीही फाटलेले नसावे, असेही सांगण्यात आले आहे.
नोटांचा क्रम आणि चांदीचा शिक्का
फेंग शुईनुसार तुमच्या पाकिटात तुम्ही ज्या नोटा ठेवता, त्या नेहमी चढत्या क्रमाने असाव्यात. म्हणजे सगळ्यात आधी दहाची नोट, त्यानंतर वीसची नोट, त्यानंतर पन्नास रुपयांची नोट, त्यानंतर शंभर रुपयांची नोट, त्यानंतर पाचशे रुपयांची नोट, असा नोटांचा क्रम असावा. यामुळे तुमच्या पाकिटात सदैव पैसा टिकून राहतो, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे.
फेंग शुई शास्त्रामध्ये चांदीला शुभ धातू मानण्यात आले आहे. फेंग शुई शास्त्रानुसार जर तुमच्या पाकिटात चांदीचा शिक्का असेल, तर आयुष्यात तुम्हाला कधी पैशांची कमी भासत नाही, असे सांगितले जाते.
हे उपाय फेंग शुई या पारंपरिक शास्त्रावर आधारित आहेत. याच्या परिणामांबद्दल कोणताही शास्त्रीय दावा करता येत नाही, हे लक्षात घ्यावे.
Leave a Reply