बीड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा एकदा तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण शहराला होणारा नळपाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. २० नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावरील पिंपळनेर सर्व्हिस रोडजवळील मुख्य जलवाहिनीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यासाठी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. शहरात आधीच १० ते १२ दिवसांआड एकदा पाणीपुरवठा होतो. त्यातही तीन दिवसांची कपात केली जाते. नोकरदार वर्ग, महिला आणि रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागते, अशी स्थिती आहे.
दर पंधरा-वीस दिवसांनी दुरुस्तीच का?
दर पंधरा ते वीस दिवसांतून एकदा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचा अघोषित नियमच लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पंधरा दिवसांपूर्वीच याच जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही ती पुन्हा कशी बिघडली, की आधीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे नागरिक विचारत आहेत. विकासकामांचा संदर्भ देऊन प्रशासन वेळ मारून नेत असले, तरी विकासकामे आणि शहरातील पायाभूत सुविधांचा ताळमेळ राखण्यात पालिका अधिकारी अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांचा संताप
पाणीपुरवठा विभागाचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असून वेळेवर आणि दर्जेदार काम केले असते, तर वारंवार जलवाहिनी दुरुस्तीची वेळ आली नसती, असे मत व्यावसायिक सुनील तांदळे आणि गृहिणी वैशाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रत्येक पंधरा दिवसांनी हीच लाइन कशी फुटते, असा सवाल नागरिक नारायण पवार यांनी उपस्थित केला. तर दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा कशी बिघडली, याचा जाब विचारत डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाने तत्काळ टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. विकतचे टँकर किंवा जारचे पाणी घेण्याची ऐपत नसलेल्या मोठ्या वर्गाचे या काळात अतोनात हाल होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
Leave a Reply