ठरलं तर मग या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागात एनआयसीयूमध्ये बाळांची अदलाबदल करून प्रिया तिथून पळ काढते. पण नेमकं पूर्णा आजीने ते पाहिलेलं असतं आणि प्रियाने काय केलं असेल, हे लगेचच तिच्या लक्षात येतं. ती पुन्हा एकदा परिस्थिती निस्तरायला जाते, पण तितक्यात तिथे सायली आणि अर्जुन येतात. जर त्या दोघांना प्रियाने केलेलं कृत्य समजलं तर त्यांना धक्का बसेल आणि रुग्णालयातही वेगळा गोंधळ निर्माण होईल, असा विचार करून ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही आणि स्वतःच ती निस्तरायची, असं पूर्णा आजी ठरवते.
आजीचा हुशारीने डाव
सायली आणि अर्जुन बाळाला पाहण्यासाठी त्या वॉर्डमध्ये जातात तेव्हा आजी त्यांना अडवते आणि म्हणते की तुम्ही सतत बाळाला मांडीवर घेऊन बसलेले असता, मला माझ्या पणतीसोबत वेळ घालवायला मिळत नाही. आता तुम्ही तुमच्या खोलीत जा, हा वेळ माझा आणि माझ्या पणतीचा आहे. ती रडायचं नाटक करते, जे पाहून सायली-अर्जुनला हसू येतं आणि ते तिथून निघून जातात.
ते निघून गेल्यावर प्रियाने घातलेला घोळ पूर्णा आजी सोडवते. ती पुन्हा एकदा बाळांची अदलाबदल करते आणि जे बाळ पूर्वी जिथे होतं, तिथेच आणून ठेवते. तिच्या मनात येतं की प्रियाच्या चुकीच्या डावाने ती सायलीच्या बाळाचे नशीब बदलायला निघाली होती, पण सटवाईने तिचं नशीब आधीच लिहिलं आहे. म्हणूनच आज तिने मला इथे वेळेवर पाठवलं आणि तिचं हे कृत्य मला समजलं. तिला आठवतं की तिने आधीच बाळाच्या उजव्या हाताला धागा बांधलेला होता, पण प्रिया तो डाव्या हाताला बांधून गेली होती.
आजी पुन्हा एकदा प्रियाच्या बाळाच्या हातातला धागा सायलीच्या बाळाच्या हातात बांधते. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित आहे का हे ती तपासत असते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने बाळांच्या पायांतले नावाचे टॅग बदललेले नाहीत. मग ती ते सुद्धा बदलते. आपण जिवंत असेपर्यंत बाळाला काहीही होऊ द्यायचं नाही, असा पण तिने केलेला असतो. ती प्रियाच्या बाळाला बोलते की माझं तुझ्याशी काहीही वैर नाही; तू ज्या आईच्या पोटी जन्म घेतला आहेस, त्याबद्दल मला तुझं वाईट वाटतं.
मधु भाऊंची चांदीची भेट
दुसरीकडे सर्व सुभेदार बाळाच्या नावाची चर्चा करत असतात. तितक्यात सायली-अर्जुन येतात आणि पूर्णा आजी बाळाला भेटू देत नाही, असा हट्ट करत असल्याची गंमत सांगतात. तितक्यात मधु भाऊ येतात आणि त्यांच्या पिशवीत ठेवलेला एक बॉक्स सायलीच्या हातात देतात. त्यात चांदीचे वाळे असतात. सायली खूप भावुक होते आणि चांदी किती महाग झाली आहे, तरीही तुम्ही एवढं का आणलं, असं विचारते. मधु भाऊ सांगतात की तू माझी लाडकी लेक आहेस, त्यामुळे इतक्या वर्षांची थोडी थोडी साठवणूक खर्च करून मी हे माझ्या नातीसाठी आणलं आहे.
प्रियाची धाकधूक
दुसरीकडे आजी गुपचूप बाळांच्या खोलीतून बाहेर पडते आणि तिला बाहेर नर्स भेटते. आधी तिच्या मनात येतं की नर्सला घडल्या प्रकाराबद्दल सांगावं, पण नंतर ती याबद्दल कोणालाही काहीही कळू न देण्याचं ठरवते. प्रिया मात्र गुपचूप स्वतःच्या वॉर्डमध्ये गेलेली असते. आज तिने जे केलं, त्याबद्दल तिला स्वतःचाच अभिमान वाटत असतो. आपल्या मुलीला सायलीच्या बाळाशी बदलून ती आता सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा शिरून त्यांच्या संपत्तीवर राज्य करू शकते, असं तिला वाटतं. तिच्या कपड्यांना वास येत असतो तेव्हा नर्स सांगते की एनआयसीयूमधलं औषध तुझ्या कपड्यांवर सांडलं आहे; हे पुसलं नाही तर सगळ्यांना संशय येईल. त्या औषधाचं सोल्युशन एनआयसीयूमध्येच असल्याने पुन्हा एकदा तिथे जावं लागेल, असं नर्स सांगते आणि आपली भांडाफोड होऊ नये यासाठी प्रिया पुन्हा तिथे जायला तयार होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply