मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा टप्प्याटप्प्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावामुळे प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः आखाती देशांसाठी सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांच्या उड्डाणांबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने फेब्रुवारी आणि मार्चनंतरच्या विमानतिकिटांच्या बुकिंगचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न ट्रॅव्हल एजंट्ससमोर उभा राहिला आहे. सध्या तिकीट बुक करताना मुंबई विमानतळच दाखवले जात असले तरी भविष्यात संबंधित विमानाचे उड्डाण नवी मुंबईतून होणार असल्यास प्रवाशांना ऐनवेळी विमानतळ बदलण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या स्थलांतराबाबत आगाऊ आणि अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी ट्रॅव्हल एजंट्सकडून होत आहे.
कोणत्या उड्डाणांचे स्थलांतर? स्पष्टता नाही
विमानसेवांच्या स्थलांतराबाबत काही विमान कंपन्यांनी ठाम भूमिका घेतली असून राजकीय हस्तक्षेपाचा इशाराही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. मात्र कोणत्या परदेशी विमानसेवेची किती उड्डाणे आणि नेमक्या कोणत्या तारखेपासून ती नवी मुंबईतून होतील, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. विमान कंपन्यांकडून याबाबत निश्चित सूचना वा वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार तिकिटे बुक केल्यानंतर विमानतळ बदलल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कनेक्टिंग फ्लाइट्सची चिंता
सर्वाधिक चिंता कनेक्टिंग फ्लाइट्सच्या प्रवास नियोजनाची आहे. एखादा प्रवासी देशांतर्गत विमानाने मुंबईत उतरून आखाती देशात जाणार असेल किंवा आंतरराष्ट्रीय विमानाने मुंबईत उतरून देशांतर्गत कनेक्टिंग फ्लाइट घेणार असेल, तर दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांदरम्यान पुरेशी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यास प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच कनेक्टिंग फ्लाइट चुकण्याचीही शक्यता आहे, असे ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापन समिती सदस्य समीर कर्नानी यांनी सांगितले. विमान कंपन्यांच्या निर्णयावर विमानतळ शुल्क, उपलब्ध स्लॉट आणि नव्या विमानतळावरील प्रोत्साहनपर सवलतींचाही प्रभाव असू शकतो. त्यामुळे विमानतळ निवडताना प्रवाशांच्या सोयीचा विचार होईलच असे नाही, असे हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींचे म्हणणे आहे. बुकिंगनंतर विमानतळ बदलल्यास तिकीट रद्द करून परतावा द्यावा लागणार असून त्यानंतर दुसऱ्या विमानाचे तिकीट काढणे, रद्द झालेल्या व्यवहाराचे बिलिंग, जीएसटी आणि क्रेडिट नोट यांसारख्या प्रक्रियांमुळे एजंट्सचा प्रशासकीय व्याप वाढणार असल्याचे जैन ट्रॅव्हल्सचे राकेश पूनमिया यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply