नाट्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मराठी संगीत नाट्य विश्वाला आपल्या गायकीने आणि दमदार अभिनयाने समृद्ध करणाऱ्या, संगीतसूर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. मात्र, प्रशासनाने या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.
आवारात कचरा, रंगमंचही खराब
नाट्यगृहाच्या आवारात अतिक्रमणात जप्त केलेल्या अनेक हातगाड्या, फ्लेक्स आणि डिजिटल फलक यांसह इतर अनावश्यक वस्तू टाकण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारातच महापालिकेच्या दप्तराची रद्दी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहे. एकेकाळी कलेतून राजवैभव निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या प्रतिमांखालीच कचऱ्याचा ढीग साचल्याचे दिसून येत आहे.
प्रत्यक्ष रंगमंच, त्यासमोरील बैठक व्यवस्था, दरवाजे, खिडक्या, स्वच्छतागृहे आणि मेकअप रूम या सर्वांची अवस्था खराब झाली आहे. ठिकठिकाणी झाडेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.
२०१९ च्या पुरानंतर दुर्लक्ष
महापालिका प्रशासनाने २०१९ च्या पुरानंतर या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या नाट्यगृहाचे नूतनीकरण व्हावे आणि सर्वसामान्य, गरीब कलाकार तसेच नागरिकांना ते वापरता यावे, यासाठी प्रशासनासह राजकीय पातळीवरही पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक केदार खाडीलकर यांनी सांगितले.
या संदर्भात सर्व नगरसेवक आणि विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घेऊन महासभेत मागणी करावी, अशी प्रतिक्रिया खाडीलकर यांनी व्यक्त केली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply