दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही दिल्लीत सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने काही ठिकाणी प्रसिद्ध झाले.
यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ना औपचारिक, ना अनौपचारिक चर्चा
गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्या तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित केल्या जात होत्या. मात्र विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही. ना औपचारिक, ना अनौपचारिक, ना आमच्या बाजूने, ना त्यांच्या बाजूने. हे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे, असे उमेश पाटील म्हणाले. खोटे नॅरेटिव्ह सेट करून स्वतःचा राजकीय अजेंडा साधण्यासाठी माध्यमांचा वापर करणाऱ्या तथाकथित सूत्रांवर किमान आतातरी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदारांच्या भेटीवरून पाटील यांचा सवाल
सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्या पुण्यात असताना पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांना भेटायला जाणे अत्यंत स्वाभाविक असल्याचे पाटील म्हणाले. मतदारसंघातील विकासकामे, जिल्हा नियोजन समितीचे विषय आणि मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे यासाठी आमदार आपल्या नेतृत्वाची भेट घेणार नाहीत तर कोणाची घेणार, असा सवाल त्यांनी केला. अशा नियमित भेटींनाही वेगळा राजकीय रंग देऊन पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधिकृत प्रवक्त्यांकडून खातरजमा करण्याचे आवाहन
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग गेल्या आठवडाभरात या बातम्या माध्यमांना नेमक्या कोणी पुरवल्या, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. काही मंडळी स्वतःचा छुपा राजकीय अजेंडा आणि वैयक्तिक राजकीय हितसंबंध साधण्यासाठी माध्यमांचा वापर करून घेत आहेत का, याचा शोध माध्यमांनीच घ्यावा, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा प्रमुख नेते यांच्याकडून वस्तुस्थितीची खातरजमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply