बुलढाणा जिल्ह्यात यंदा कपाशीचे पीक अवघ्या दोन ते तीन वेचण्यांतच संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकीकडे कापसाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना दुसरीकडे उत्पादनातही मोठी घट झाली. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके, फवारणी आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. कमी उत्पादन आणि घसरलेले बाजारभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, मलकापूर आणि शेगाव या तालुक्यांमध्ये यंदा कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला. सुरुवातीला मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली.
लागवडीनंतर १५ दिवस पावसाची दडी
मात्र, लागवडीनंतर जवळपास पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली. त्यानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. परंतु, पुढील काळात पावसाच्या अनियमिततेचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. काही भागांत पावसाचा खंड, तर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे कपाशीच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले. परिणामी पिकांवर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढून पात्यांची गळ झाली.
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके आणि तणनाशकांची फवारणी केली. मात्र, वाढत्या खर्चानंतरही पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. कपाशीला पुरेशा प्रमाणात बोंडे लागली नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.
खर्च वाढत असताना उत्पादन मात्र अत्यल्प
विशेष म्हणजे, यंदा पहिली, दुसरी आणि तिसरी वेचणी यांच्या उत्पादनातही फारसा फरक दिसून आलेला नाही. एकूणच प्रत्येक वेचणीत कमी कापूस हाती आल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अवघ्या दोन ते तीन वेचण्यानंतरच कपाशीचा हंगाम संपुष्टात आला. काही ठिकाणी एकरी केवळ २ क्विंटलपर्यंत उत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील वर्षीही कापसाला अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदाही बाजारभावात समाधानकारक वाढ नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कापूस वेचणीसाठी लागणारी मजुरी, वाहतूक आणि इतर शेतीकामांचा खर्च वाढत असताना उत्पादन मात्र अत्यल्प हाती येत आहे. त्यामुळे शेतीत केलेली गुंतवणूक भरून काढणेही कठीण झाले आहे.
मोताळ्याचे शेतकरी दिनेश पवार म्हणाले की, अल निनोच्या संभाव्य प्रभावासह पावसाच्या अनियमिततेचा कोरडवाहू भागातील कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला असून हंगाम अवघ्या एक ते दोन वेचण्यांतच संपुष्टात आला आहे. उत्पादन घटले असताना बाजारातही रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतीचा खर्च भरून काढणे कठीण झाले आहे. कापसाला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखी गडद होईल. कापसाला रास्त भाव मिळाला नाही, तर यंदाच्या हंगामातील नुकसान पुढील वर्षांच्या शेती नियोजनावरही परिणाम करू शकते. पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेतीखर्चाची तरतूद कशी करायची, तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
Leave a Reply