बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज १८ ते १९ वाहनांचा भीषण अपघात झाला. वाहने साखळी पद्धतीने एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये अनेक वाहनांचा चुराडा झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात बसलेले १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर समृद्धी महामार्ग प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री आणि शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची गाडीही अपघातस्थळी उभी होती. त्यांनी या अपघाताचा थरारक प्रसंग सांगितला आहे.
नेमकी घटना कशी घडली?
आज सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीडजवळ ही घटना घडली. अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू होते. त्यामुळे महामार्गावरून जाणारी वाहतूक काही काळ रस्त्यावरच थांबवण्यात आली होती. मात्र समृद्धीवरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने उभ्या वाहनाला धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली आणि अपघात झाला.
अपघातात लहान मुलेही जखमी झाली आहेत. मदत करणाऱ्यांनी वाहनात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या अपघातात जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने आणि अनेक जण गावी जात असल्याने समृद्धी मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे.
राजेश टोपे यांनी सांगितला प्रसंग
राजेश टोपे यांनी सांगितले की, ते नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. परतीचा प्रवास करत असताना साधारण साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. एका मिक्सरची ट्रॉली पलटी झालेली होती आणि त्या ट्रॉलीमुळे मुंबईकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे अनेक गाड्या रांगेत थांबलेल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका स्टीलच्या ट्रकच्या चालकाला ट्रक अजिबात नियंत्रणात आला नाही. त्यामुळे त्याने मागच्या सगळ्या गाड्यांना धडक दिली. महत्त्वाचे म्हणजे टोपे यांची गाडी ज्या ठिकाणी उभी होती, त्याच्या अगदी बाजूला उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून धडक देऊन तो ट्रक थांबला, असे टोपे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply