भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या वनडे मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताला 244 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. न्यूझीलंडविरुद्धचाही भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. 334 धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा संघ अवघ्या 89 धावांत कोलमडला. माउंट माउंगानुईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट टीम इंडियाच्या डावातील पहिली ओव्हर ठरली.
पहिलीच ओव्हर ठरली निर्णायक
न्यूझीलंडने फलंदाजी घेताना संपूर्ण 50 ओव्हर खेळून 333 धावा केल्या होत्या. त्यामुळे धावांचा डोंगर पार करण्यासाठी टीम इंडिया तडाखेबाज सुरुवात करेल, अशी आशा होती. पण तसं झालं नाही. समोर मॅट हेन्री काळ बनून उभा होता. हेन्रीने पहिल्याच ओव्हरमध्ये भारताची टॉप ऑर्डरच नेस्तनाबूत करून टाकली. ओपनिंग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माला हेन्रीने पहिल्याच चेंडूत बाद केले. रोहित पव्हेलियनमध्ये गेल्यावर विराट कोहली मैदानात आला. त्याने तीन चेंडूंचा सामना केला. पण हेन्रीने त्याला षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्लिन बोल्ड केले. लागोपाठ दोन बडे खेळाडू तंबूत परतल्यावर भारताला मोठा झटका बसला होता. हेन्रीचं वादळ एवढ्यावरच थांबणार नव्हतं. त्याने त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कार्यवाहक कर्णधार श्रेयस अय्यरला पायचीत करून बाद केले. या तिन्ही फलंदाजांनी खातंही उघडलं नाही. धक्कादायक म्हणजे पहिली ओव्हर संपली तेव्हा भारताचा स्कोअर शून्य होता. तीन खेळाडू बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी नंतर मान वर काढली नाही.
61 धावांवर सहा गडी बाद
भारतीय संघाने केवळ 9 धावा काढल्या तेव्हा टीम इंडियाचे 4 गडी बाद झाले होते. रुतुराज गायकवाडची बॅटही फार जादू करू शकली नाही. तोही 5 धावा करून बाद झाला. नंतर आलेल्या इशान किशन आणि अक्षर पटेलने लाज राखण्याचा प्रयत्न केला. पण मॅथ्यू फिशरने भारताला पाचवा झटका दिला. टीम इंडियाच्या 53 धावा झाल्या होत्या. तेव्हा अक्षरने 36 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. तर इशानने 53 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. 27 धावांवर तोही बाद झाला. आता भारताचा स्कोअर 61 धावांवर 6 बाद झाला होता.
न्यूझीलंडच्या दमदार गोलंदाजीपुढे भारताचा एकही खेळाडू टिकू शकला नाही. भारताला 100 धावाही करता आल्या नाहीत. शेवटचे चार बळीही 28 धावांच्या आतच पडले. अकीब नबी आणि कुलदीप यादव यांचाही कारभार स्वस्तात आटोपला. नमन धीरने 24 चेंडूत 21 धावा केल्या. नंतर त्याला मॅथ्यू फिशरने बाद केले. गुरनूर बरारने दोनच धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 9.4 ओव्हरमध्ये केवळ 27 धावा देऊन 6 बळी घेतले, तर मॅथ्यू फिशरने 3 बळी काढले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply