नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या नव्या इमारती राज्यात सर्वोत्तम असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. या अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट केली जाणार आहे. तळोदा तालुक्यातील आमलाड, तळवे, मोरवड, उमरी आणि मोड या गावांतील प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारतींचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारणी
जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने फीडिंग इंडिया या संस्थेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती बांधण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, सहायक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, तहसीलदार दीपक धीवरे, फीडिंग इंडियाचे वृषभ चोपडा आणि मोरवडच्या सरपंच अक्षता वळवी उपस्थित होते.
फीडिंग इंडिया संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराच्या कामाचे मंत्री तटकरे यांनी कौतुक केले. अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधा आणि कुपोषण निर्मूलनाच्या कामात नंदुरबार जिल्ह्याचे काम देशपातळीवर उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. झोमॅटोच्या फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या आधुनिक अंगणवाड्यांचा विस्तार जिल्हाभर होणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.
दररोज हजारो बालकांना भोजन
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वयंपाकघरातून दररोज सुमारे पाच हजार आठशे बालकांना दोन वेळेचा आहार दिला जात आहे. डिसेंबरपासून जवळपास पंचवीस हजार बालकांना भोजन देण्याचे नियोजन आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी फीडिंग इंडियाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजना आणि लेक लाडकी योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी बेबी केअर किटही देण्यात आले. त्यांनी ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनतर्फे उभारलेल्या ईपीडीएस युनिटची माहिती घेतली. तसेच एनर्जी प्रोटीन डेन्स सप्लिमेंट ईपीडीएस निर्मिती युनिट आणि फीडिंग इंडिया झोमॅटोच्या सेंट्रल किचनला त्यांनी भेट दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply