धुळे शहरात दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या एका संगीतमय कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. खानदेश यूथ फाउंडेशनने पांझरा नदीवरील पांझरेश्वर महादेव पुलावर दिवाळी सांज पाडवा ही भक्तिमय संगीत मैफल आयोजित केली होती. महानगरांमधील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला संगीत मैफलीचा म्हणजेच म्युझिक जॅमिंगचा कल या फाउंडेशनने धुळ्यात यशस्वीपणे रुजवला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या या उपक्रमाला असंख्य रसिकांनी हजेरी लावली. रायजिंग स्टार म्युझिक ॲकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार आणि भक्तिमय गीतांनी पुलाचा परिसर मंत्रमुग्ध झाला. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
तरुणाईने घडवले सकारात्मक वातावरण
धुळे शहराबद्दल अनेकदा नकारात्मक चर्चा ऐकायला मिळते. मात्र तरुणांनी एकत्र येऊन शहरात सकारात्मक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केले, ही कौतुकास्पद बाब असल्याची भावना उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईने व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संयोजन फाउंडेशनचे संस्थापक क्षितिज साळुंके आणि सदस्यांनी केले.
फाउंडेशनचे यापूर्वीचे उपक्रम
खानदेश यूथ फाउंडेशनने यापूर्वीही अनेक उपक्रम राबवले आहेत. उडाण उपक्रमांतर्गत नागरी उड्डाण क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन करण्यात आले. नवउद्योजकांना अनुभवी उद्योगपतींशी जोडणारा टॉक शो तसेच खानदेशातील सर्वांत मोठे वक्तृत्व व्यासपीठ असलेली शब्दभूषण स्पर्धाही फाउंडेशनने आयोजित केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply