दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेजारील ठाणे शहरात फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे उंच इमारतींना आग लागण्याच्या गंभीर घटना घडल्या होत्या. याची दखल घेत राज्य सरकारने रात्री दहा नंतर फटाके फोडण्यावर तसेच आकाशात उंच जाणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली होती. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नवी मुंबईत या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.
वाशी (सेक्टर १७ व २९), नेरूळ (पाम बीच रोड लगतचा परिसर), कोपरखैरणे, ऐरोली आणि खारघर (सेक्टर ७ व १२) या भागांत रात्रभर उंच उडणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही आकाशात उंच उडणारे फटाके फोडले जात होते. यामुळे ध्वनिप्रदूषण तर झालेच, शिवाय उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. इतका प्रकार घडूनही नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. यासंदर्भात नवी मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता झाला नाही.
अनेक ठिकाणी आगीच्या घटना
सानपाडा (सेक्टर ८) येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या दुचाकींवर उंच उडणाऱ्या फटाक्यांची ठिणगी पडल्याने तीन दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने आग इतर वाहनांपर्यंत पसरली नाही.
सीवूड्स (सेक्टर ४०) येथे एका उंच इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या प्लॅस्टिक व इतर टाकाऊ साहित्यावर बाहेरून आलेले रॉकेट पडल्याने आग भडकली. रहिवाशांनी व अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कोपरखैरणे (सेक्टर १४) येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या कुंडीला व सुक्या झाडाझुडपांना फटाक्यांमुळे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
बंदीचे आदेश असतानाही शहरात रात्रभर फटाक्यांची आतषबाजी सुरू राहिल्याने आणि त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply