जमीन अथवा घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा बदल झाला आहे. या व्यवहारात अनेकदा फसवणूक होत होती. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये हमीदाराची, ओळखीच्या व्यक्तीची किंवा साक्षीदाराची गरज आता उरलेली नाही. यापुढे सर्व पक्षकारांचे आधार प्रमाणीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे दलालांनाही मोठी चाप बसणार आहे.
साक्षीदाराऐवजी आता आधार प्रमाणीकरण
यापूर्वी व्यवहारासाठी अंगठ्याचा छाप, म्हणजेच थंब घेतला जात असे. तो जुळला नाही तर दोन साक्षीदार उभे करून हा व्यवहार पूर्ण होत होता. पण याचा गैरफायदा घेऊन जमीन खरेदी-विक्रीत फसवणूक वाढली आणि बोगस व्यवहार वाढले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ही साक्षीदाराची सोय बंद केली आहे. नवीन नियमांनुसार, जोपर्यंत फिंगरप्रिंटद्वारे प्रमाणीकरण होत नाही, तोपर्यंत कोणताही दस्त नोंदवला जाणार नाही.
ऑनलाइन पडताळणीसाठी काय आवश्यक?
नवीन ऑनलाइन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पक्षकारांकडे अँड्रॉईड ९.० अथवा त्यापुढील अद्ययावत स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा आणि अधिकृत आधार अॅप असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी नागरिकांनी नोंदणीचे सोपस्कार दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी पूर्ण करायचे आहेत. मोबाईलमधील आधार अॅपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शासन निर्णयाचे स्वागत होत असले तरी दुय्यम निबंधक कार्यालय आणि तिथली यंत्रणा अधिक व्यापक आणि अद्ययावत करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणची ही कार्यालये अत्यंत कोंदट, सोयी-सुविधांचा अभाव असलेली आहेत. अशा कार्यालयात नवीन नियम राबवणे जिकरीचे होणार असले तरी हा बदल आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या नवीन नियमांमुळे थंब व्हेरिफिकेशन न होता होणाऱ्या व्यवहारांना चाप बसणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टळणार असून त्यांच्या मेहनतीचा पैसा अशा व्यवहारात फसणार नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply