राज्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. गावागावांत पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी पाणी कपात जाहीर केली आहे. उन्हाळा अजून यायचा असताना आताच अशी स्थिती असल्याने नागरिक चिंतेत आहेत. प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मराठवाड्यात ६०१ टँकरने पाणीपुरवठा
मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भूजल पातळी खालावली असून नोव्हेंबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विभागातील ३७९ गावे आणि २४९ वाड्यांना सध्या ६०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक २९६ टँकर सुरू असून १७४ गावे आणि १८३ वाड्यांना पाणी दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११९ गावे आणि ३४ वाड्यांसाठी १७९ खासगी टँकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यात ७१ गावे आणि ३२ वाड्यांना १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे, तर धाराशिव जिल्ह्यातील १५ गावांसाठी २३ खासगी टँकर सुरू आहेत.
विशेष म्हणजे, मराठवाड्यातील एकूण ६०१ टँकरपैकी केवळ ५ शासकीय असून ५९६ खासगी टँकर आहेत. आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने ३ ते ४ हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे.
धरणांतील साठा झपाट्याने घटतोय
बीड आणि माजलगाव शहरांची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात सध्या केवळ १९.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३१२ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ६१.५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. झपाट्याने घटत्या पाणीसाठ्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ ४१ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात धरणात १०० टक्के जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील साठ्यात ६० टक्के घट झाली आहे. आगामी काळात पाणी वाटपात कपात होण्याची शक्यता असून यंदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने ओढ दिल्यानंतर उपलब्ध जलसाठ्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी २४८.७५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता, तो १२ नोव्हेंबरपर्यंत घटून २२०.९७५ दलघमीवर आला आहे. अवघ्या २८ दिवसांत २७.७७८ दलघमी पाण्याची घट झाली असून सध्या एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ४७.५४ टक्के शिल्लक आहे. पेनटाकळी प्रकल्पात ७.७५१ दलघमी, तर नळगंगा प्रकल्पात ४.४६० दलघमी पाण्याची घट नोंदवण्यात आली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा उपयुक्त साठा शून्यावर असून तेथे ५३.९०६ दलघमी मृतसाठा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९२१ गावांमधील १७ लाख ५२ हजार नागरिक आणि ६ लाख १८ हजार पशुधनासाठी ४२.४६ दलघमी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply