मराठवाड्यात पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. विभागातील एकूण ९३१ प्रकल्पांत केवळ ३७.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोसमी पाऊस कमी झाल्यामुळे धरणांत पुरेसे पाणी नाही. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच पाणीसाठा कमी झाला असल्याने पुढील सहा महिने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
विभागातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणातील पाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागातील मोठ्या धरणांत ५१.८५ टक्के पाणीसाठा आहे. ८१ मध्यम प्रकल्पांत १७.२५ टक्के, तर ८०६ लघु प्रकल्पांत १३.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
कुठे किती पाणीसाठा शिल्लक?
चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ६९.७४ टक्के पाणीसाठा आहे. माजलगावमध्ये १९.६२ टक्के, मांजरामध्ये ४.८९ टक्के, सिद्धेश्वरमध्ये १५.६६ टक्के, येलदरीमध्ये ५४.९८ टक्के, विष्णुपुरीमध्ये ५९.९७ टक्के, निम्न दुधनामध्ये १२.२६ टक्के, निम्न तेरणामध्ये १७.७ टक्के आणि निम्न मनारमध्ये १७.८३ टक्के पाणीसाठा आहे.
मध्यम आणि लघु प्रकल्पांसह साखळी बंधारे, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, शेततळे आणि विहिरी यांत पाणीसाठा नाही. विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बी हंगामात पुरेसे पाणी नसल्यामुळे गहू आणि हरभरा ही पिके घेणेसुद्धा कठीण झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत रब्बीचे केवळ २० टक्के क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.
टँकरने पाणीपुरवठा, जानेवारीनंतर टंचाई वाढणार
लघु प्रकल्पांत फक्त १३ टक्के पाणीसाठा आहे आणि कोरड्या लघु प्रकल्पांची संख्या जास्त आहे. एका धरणावर परिसरातील दहा ते पंधरा गावे अवलंबून आहेत. या गावांना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांची स्थिती गंभीर आहे. जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा अधिक बसतील, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणातून पाच नोव्हेंबरपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कालव्यांच्या साफसफाईमुळे १० नोव्हेंबरपासून डाव्या कालव्यात ३०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. उजव्या कालव्यात विसर्ग सोडण्यात आलेला नाही. दोन्ही कालव्यांत रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी हंगामासाठी एक आवर्तन सोडले जाणार आहे. पहिले आवर्तन सहा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओल नाही. सिंचनामुळे काही भागात पेरणी होण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply