सोशल मीडिया वापरणाऱ्या लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मेटा कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने वापरकर्त्याचे वय ओळखले जाणार आहे. खाते तयार करताना चुकीची जन्मतारीख नोंदवली तरी, एआय प्रणाली वापरकर्त्याच्या हालचाली आणि वापराच्या पद्धतींचे विश्लेषण करून त्याच्या वयाचा अंदाज घेणार आहे.
एआय वय ओळख प्रणाली कशी काम करणार?
मेटाच्या नवीन प्रणालीमध्ये केवळ जन्मतारखेवर अवलंबून न राहता, खात्यावरील माहिती आणि वापराच्या पद्धतींचे विश्लेषण केले जाणार आहे. एखादा वापरकर्ता किशोरवयीन असल्याचे आढळल्यास, त्याचे खाते आपोआप टीन अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाईल. यामुळे मुलांना वयाला अयोग्य कंटेंट आणि अनोळखी व्यक्तींच्या संदेशांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. मेटाने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये या सुविधेची माहिती दिली आहे. कंपनी एप्रिल २०२५ पासून या तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. जागतिक स्तरावर मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीन अकाउंटमध्ये मिळणार विशेष सुरक्षा
किशोरवयीन खात्यांसाठी मेटाकडून अनेक सुरक्षा सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये स्क्रीन टाइम मर्यादा, रात्री नोटिफिकेशन्स बंद ठेवण्यासाठी क्वाएट मोड, कठोर गोपनीयता नियम आणि अयोग्य कंटेंटवर निर्बंध यांचा समावेश आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेशही मर्यादित केले जाणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता, न्यूनगंड, झोपेचा अभाव, नैराश्य, सायबर बुलिंग आणि फोमो यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून ही सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची ठरू शकते.
जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
मेटाच्या माहितीनुसार, नवीन सुरक्षा सुविधा आणि एआय आधारित वय पडताळणी प्रक्रिया जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. मात्र, ही प्रणाली किती अचूकपणे वय ओळखते आणि वापरकर्त्यांची गोपनीयता कशी जपते, हे प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर स्पष्ट होईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply