जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल चौधरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून असंख्य मतदारांच्या नावांवर हरकती घेण्याचा कट सावकारे यांनी रचल्याचा आरोप चौधरी यांनी केला.
नेमका आरोप काय?
अनिल चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर सावकारे यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेणे हा त्यांच्या राजकीय घसरणीचा भाग असून, आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपदही जाणार असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
दुसरीकडे, महायुतीतील तिन्ही पक्ष एसआयआरसाठी स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भाजपवर आक्षेप नोंदवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सावकारे यांचे प्रत्युत्तर
अनिल चौधरी यांच्या आरोपांना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे इतके वाईट दिवस आलेले नाहीत की, एखाद्या तडीपार व्यक्तीच्या सल्ल्याने मंत्रिपद काढले जाईल, अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरी यांच्यावर निशाणा साधला.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या अनिल चौधरी यांची संपूर्ण शिवसेना आणि भाजपही त्यांच्या घरची असल्यासारखी वक्तव्ये सुरू असल्याचा टोलाही सावकारे यांनी लगावला. चौधरी यांच्यासमवेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयआरबाबत भाजपवर आक्षेप घेण्याचे निर्देश दिले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत वरिष्ठ पातळीवर माहिती कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भुसावळमधील महायुतीतील दोन मित्रपक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply