दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाच्या आमदारांबाबत मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
पाटील नेमके काय म्हणाले?
अनिल पाटील यांनी सांगितले की, संजय राऊत नेहमी असेच विधान करतात की आमचे २५ आमदार एका पक्षात जाणार, २२ आमदार दुसऱ्या पक्षात जाणार. आमदारांच्या कपड्यांच्या पिशव्या भरून तयार आहेत आणि त्यांना राऊत यांच्याकडे जायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही आता कुठल्या पक्षात जायचे, असा प्रश्नही त्यांनी राऊत यांना विचारला.
राऊत हे निराधार विधान करत असल्याचे पाटील यांनी म्हटले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही राऊत असेच बोलले होते, मात्र त्यानंतर त्यांचे म्हणणे खरे ठरले नव्हते. राष्ट्रवादी पक्षाचा एकही आमदार कुठेही जाणार नाही, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
विलिनीकरणावरून रोहित पवारांवरही टीका
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पाटील यांनी रोहित पवार यांच्यावरही टीका केली. विलिनीकरणाचा प्रश्न आपल्या पक्षाच्या पातळीवर कुठेही सुरू नाही, असे त्यांनी सांगितले. विलिनीकरणाचा मुद्दा सुरू असेल तर त्यावर बोलण्याचा रोहित पवार यांना मुळात अधिकारच नाही. रोहित पवार यांनी आधी आपला पक्ष तपासला पाहिजे आणि आपल्या पक्षात किती आमदार आहेत, हे पाहिले पाहिजे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
विलिनीकरणाबद्दल भाजपला सोडून चर्चा होऊच शकत नाही, असेही पाटील म्हणाले. भाजप हा एनडीएतील सर्वात मोठा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply