शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

भाऊबीजेच्या गर्दीमुळे जळगाव एसटीला दोन कोटींचे उत्पन्न

भाऊबीजेला जळगाव एसटी विभागाने २,३३,३८५ प्रवाशांची वाहतूक केली. त्यात १,१८,००० महिला प्रवाशांचा समावेश असून सवलतींसह २ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

भाऊबीजेच्या गर्दीमुळे जळगाव एसटीला दोन कोटींचे उत्पन्न

जळगाव : भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ-बहिणींच्या भेटीगाठींसाठी निघालेल्या प्रवाशांमुळे जळगावसह विभागातील एसटी बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली होती. सकाळपासूनच बसस्थानकांवर प्रवाशांची लगबग, गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी धावपळ आणि फलाटांवर लागलेल्या बसेसचे चित्र पाहायला मिळाले. या वाढलेल्या गर्दीचे नियोजन करत जळगाव एसटी विभागाने भाऊबीजेच्या दिवशी सवलतींसह २ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगिरीत सर्वाधिक प्रवासी आणि महिला प्रवाशांच्या वाहतुकीत जळगाव विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले.

दिवाळीचा सण आणि भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी जाणाऱ्या महिला, बहिणींच्या भेटीसाठी निघालेले भाऊ तसेच सुटीनंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या नागरिकांची मोठी गर्दी एसटी बसस्थानकांवर होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध बसेस मार्गस्थ ठेवण्यावर विभागाने भर दिला. चालक-वाहकांच्या नियोजनबद्ध ड्युट्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रवासी वाहतुकीचा मोठा भार यशस्वीपणे सांभाळण्यात आला.

महिला प्रवाशांचा सर्वाधिक सहभाग

या दिवशी एकूण २ लाख ३३ हजार ३८५ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. त्यात १ लाख १८ हजार महिला प्रवाशांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर एसटीला पसंती दिली. भाऊबीजेच्या दिवशी जळगाव विभागाची एकूण वाहतूक ३.२५ लाख किलोमीटर झाली. सवलती वगळून १.२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर सवलतींसह उत्पन्न २.०९ कोटी रुपये झाले.

राज्यातील क्रमवारीत जळगाव विभाग अव्वल

सर्वाधिक प्रवासी वाहतुकीत आणि महिला प्रवासी वाहतुकीत जळगाव विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला. वाहतूक किलोमीटरमध्ये विभागाने द्वितीय, तर उत्पन्नात तृतीय क्रमांक पटकावला. सर्व बसेस मार्गस्थ ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनबद्ध वापर करण्यात आला. चालक-वाहकांचे कर्तव्यनिष्ठ योगदान आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance