सिन्नर: शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवासी गेल्या आठ वर्षांपासून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येने त्रस्त आहेत. अपना गॅरेज ते डुबेरे नाका आणि शिवनदी ते ढोकी फाटा असा दाट वस्तीचा हा प्रभाग आहे. शिवनदी व सरस्वती नदीच्या कडेला वसलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने अनेकांना पाण्यावाचून राहावे लागते.
काही नागरिकांना पाणी मिळते, तर काही जण तसेच पाण्यावाचून राहतात. जलकुंभ भरल्यानंतर या भागाला पुन्हा काही काळ पाणी सोडले जाते, मात्र आठ वर्षे उलटूनही ही समस्या सुटलेली नाही. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
नगरसेवकांकडून स्वखर्चाने टँकर
शेळके गल्लीत अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. पुरेसे पाणी मिळत नसल्याने अखेर नगरसेवक सुवर्णा उबाळे यांनी स्वखर्चातून टँकर सुरू केले आहेत. प्रशासनाला ही समस्या जागेवर बोलावून दाखवण्यात आली असली, तरी हा प्रश्न अजून तसाच आहे. तांबेश्वरनगरातील रस्त्याचा प्रश्न मात्र आता सुटला आहे.
दुर्गंधी आणि इतर मुलभूत प्रश्न
तांबेश्वरनगराजवळून देवनदी वाहते. नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने ते साचून राहते आणि परिसरात दुर्गंधी पसरते, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. झोपडपट्टीतील घरांचे नियमन करण्याबाबत नागरिक आशादायी आहेत; त्यासाठी रहिवाशांचे अर्ज भरून घेतले गेले आहेत, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
शेळके गल्ली, अपना गॅरेज आणि हुसेनबाबा नगर परिसरात रस्ते खराब आहेत. काही भागांत पाणी येताच वीज गायब होते. प्रभागासाठी शेळके गल्ली, अपना गॅरेज, उबाळे मळा, वाजे-वारुंगसे मळा येथील रस्ते आणि बंदिस्त गटारी, डुबेरे रस्त्यासह दोन नवीन ट्रान्सफॉर्मर आणि तांबेश्वरनगरात बगीचा विकसित करण्याचे प्रस्ताव नियोजित आहेत. रस्ते, वीज आणि पाणी असे मुलभूत प्रश्न सोडवले जात असल्याचे नगरसेवकांनी सांगितले आहे, तर नागरिकांना नगरात चांगला बगीचा व्हावा आणि घंटागाड्या वेळेत येऊन कचरा संकलन व्हावे, अशी अपेक्षा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply