यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असताना धुळे जिल्ह्यात युवा सेनेच्या वतीने दिवाळी संवेदनशील पद्धतीने साजरी करण्यात आली. ठाकरे सेनेच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ‘एक करंजी शेतकरी बांधवांसोबत’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
बैलगाडीने फराळ, घरोघरी सदिच्छा भेट
उपक्रमांतर्गत बैलगाडीने जाणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना फराळ देण्यात आला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली. घरातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दिवाळीचा फराळ आणि करंजी सुपूर्द करण्यात आली. खेडोपाड्यातील शेतकरी कुटुंबांच्या दारी जाऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करण्यात आली. बळीराजाला एकाकी वाटू नये, यासाठी प्रेमाचा फराळ वितरित करण्यात आला.
सणापेक्षा दिलासा महत्त्वाचा
निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा शेतकरी आर्थिक आणि मानसिक अडचणीतून जात आहेत. अशा परिस्थितीत उत्सवाचा अवाजवी खर्च टाळत आणि सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आला. केवळ सण साजरा न करता दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आणि भावनिक दिलासा देण्याचे काम या माध्यमातून झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आज तो संकटात असला तरी सणाच्या दिवशी त्याच्या घरात निराशेचे सावट राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख कानकाटे यांनी व्यक्त केली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply