अंधेरी पूर्व भागात मेट्रोच्या पुलाखाली आणि पोलिस ठाण्याजवळील वळणावर गेल्या अनेक महिन्यांपासून गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात सतत दुर्गंधी पसरलेली असते. त्यातच रस्त्याच्या कडेला सुमारे ४० ते ५० अपघातग्रस्त रिक्षा उभ्या करून ठेवल्या आहेत. या रिक्षांनी रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापल्याने वाहनचालकांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागतो आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पादचाऱ्यांसाठी फुटपाथच नाही
या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी फुटपाथ उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. रिक्षांमुळे चालण्यासाठीही पुरेशी जागा उरलेली नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाकडे जाणारा आणि पोलिस ठाण्यालगतचा हा मार्ग दिवस-रात्र वर्दळीचा असून, दररोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात.
नागरिकांची मागणी काय?
काही दुकानदार आणि रहिवाशांकडून या रिक्षांचा कचराकुंडीसारखा वापर केला जात आहे. रिक्षांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधीत आणखी भर पडली आहे. अनेक महिन्यांपासून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून अपघातग्रस्त रिक्षा हटवाव्यात, गटाराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply