गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. आजही भारतीय कमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्यूचरमध्ये चांदीच्या किंमतीत २५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव घसरून १.८२ लाख रुपये प्रति किलोग्राम झाला आहे. त्याच पद्धतीने सोन्याच्या भावातही घसरण झाली असून सोन्याच्या भावात ७०० रुपये प्रति १० ग्रॅमची घसरण दिसत आहे. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव १.३९ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर आला आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्याची हीच ती संधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण
आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळेच भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत ०.४४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव घसरून ४,०१२.६२ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे. तसेच वैश्विक बाजारात चांदीची किंमत घसरून ५२ डॉलर प्रति औंसवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या या घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावरही झाला आहे.
भाव घसरण्यामागील कारण
बुलियन बाजारात आलेल्या या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत २.६८ टक्क्याने वाढून ९३.९४ डॉलर प्रति औंसवर गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय अमेरिकेतील ताज्या महागाईच्या आकड्यांनीही सोने आणि चांदीच्या किंमतीवर मोठा दबाव आला आहे. कच्च्या तेलाच्या दरात आलेली उसळी आणि अमेरिकेचे आर्थिक आकडे यामुळे धातूच्या किंमती घसरल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईत भाव काय?
मुंबई आणि कोलकात्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४१,९७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,१४० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे. हाच भाव चेन्नई, पुणे आणि बंगळुरू या मोठ्या शहरांमध्येही पाहायला मिळत आहे. या ठिकाणी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४१,९७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,१४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर मुंबई आणि कोलकात्यात चांदी १.९९ लाख रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गुंतवणूकदारांना सल्ला काय?
गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या भावात अचानक बदल झालेला दिसून येत असून त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारही सराफा बाजारावर करडी नजर ठेवून आहेत. जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे बाजारात चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमच्या सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply