जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सापडले. बुधवारी मारवाहजवळील देहरना जंगलात स्थानिकांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. या भागात दहशतवाद्यांशी चकमक झाल्याचं समोर आलं. या चकमकीनंतर दोन्ही जवानांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर जंगलात मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली.
गोळीबारानंतर दोघेही बेपत्ता
शहीद झालेल्या जवानांची ओळख पटली आहे. रशपाल कुमार (४०) आणि बॉबी चंद (५४) अशी त्यांची नावं आहेत. ते स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचे सदस्य होते. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन्ही जवान टेहळणी आणि निगराणी करत होते. ते परिसरात गस्तीवर होते आणि आपल्या पोस्टवर जात होते. तेव्हाच त्यांचा संपर्क तुटला. त्यापूर्वी दुपारी जवळपास साडेतीन वाजता या परिसरात गोळीबाराचा आवाज स्थानिकांनी ऐकला होता.
किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन भागात बुधवारी ही घटना घडली. हे दोघे कियार या गावातील आपल्या कॅम्पमधून मरवाह येथील लष्कराच्या चौकीकडे जात होते. पण त्या कॅम्पपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते बेपत्ता झाले. त्यांचे मोबाईलही बंद होते. स्थानिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने एकत्रित शोधमोहीम राबवली.
या भागात दहशतवाद्यांचा वावर
किश्तवाड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आणि जंगल परिसरात दहशतवादी लपल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात सातत्याने शोधमोहीम राबवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये झालेल्या चकमकीत या परिसरात चार दहशतवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला होता. २०२५ मध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते आणि एक जवान शहीद झाला होता. २०२४ मध्ये तीन सुरक्षा कर्मचारी आणि दोन नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. दहशतवादी या परिसरात लपल्याचं समोर आल्यानंतर सुरक्षा दल सतर्क झालं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply