सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह असून नातेवाईक एकमेकांकडे दिवाळीसाठी जात-येत आहेत. मात्र, ऐन उत्सवाच्या काळात नाशिक जिल्ह्यात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
ही घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात घडली. भाऊबीजेच्या दिवशीच चव्हाण कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धरणाच्या पाण्याचा अंदाज आला नाही
बेझे धरणाच्या लगत असलेल्या उत्तम चव्हाण यांच्याकडे दिवाळीनिमित्त पाहुणे आले होते. त्याच कुटुंबातील तीन जण सकाळच्या सुमारास आंघोळीसाठी धरणाजवळील पाण्याकडे गेले. आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्षे), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्षे) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्षे) यांचा समावेश आहे. वडिलांसह दोन मुलींचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत. धरण परिसरात आंघोळीसाठी जाताना पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply