पिंपरी-चिंचवड शहरात छटपूजेच्या तयारीवरून वाद निर्माण झाला आहे. पवना नदीसह शहरातील विविध घाटांवर छटपूजेची तयारी सुरू असताना घाटांवर रंगीत पट्टे आखून नावे लिहिण्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर मनसेने नाराजी व्यक्त केली असून आक्षेप घेतला आहे. घाटांवर पट्टे मारून सातबारा केल्यासारखी नावे लिहिणे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. देवपूजेला विरोध नसून सार्वजनिक घाटांवर अशा पद्धतीने हक्क सांगण्याला विरोध असल्याचेही मनसेने स्पष्ट केले आहे.
पिंपरी घाटावर कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून रेषा आखण्याचे कृत्य केले आहे, असे पिंपरी चिंचवड छटपूजा समितीचे म्हणणे आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. मात्र या एका घटनेवरून संपूर्ण उत्तर भारतीय समाजाला लक्ष्य करणे किंवा छटपूजेच्या उत्सवाबाबत वाद निर्माण करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर भारतीय समाज शहराचा अविभाज्य घटक
उत्तर भारतीय समाजातील बहुतांश नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनेकांचे कुटुंब, व्यवसाय, रोजगार आणि मुलांचे शिक्षण याच शहराशी जोडलेले आहे. त्यामुळे या शहराविषयी त्यांच्या मनात आपुलकी आणि आत्मीयतेची भावना आहे. छटपूजा हा त्यांच्या समाजाचा महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शहरातील घाटांवरच हा उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो. यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही, असे गुप्ता यांनी पत्रकात म्हटले आहे.
घाटांची स्वच्छता समाजबांधव स्वतःच्या खर्चातून करतात
शहरातील बहुतांश घाटांवर स्वच्छता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. अनेक ठिकाणी घाटांवर कचरा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यंत्रणेवर पूर्णपणे अवलंबून न राहता उत्तर भारतीय समाजबांधव एकत्र येऊन अनेक घाटांची स्वच्छता स्वतःच्या खर्चातून करतात. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर घाट स्वच्छ करणे, परिसर व्यवस्थित ठेवणे आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजबांधव पुढाकार घेतात. त्यामुळे घाटांच्या स्वच्छतेसाठी आणि व्यवस्थेसाठी योगदान देणाऱ्या समाजाला केवळ एका खोडसाळ प्रकारावरून दोषी धरणे योग्य ठरणार नाही, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आजवर छटपूजेच्या निमित्ताने शहरात अशा प्रकारचा वाद निर्माण झालेला नाही. दरवर्षी उत्तर भारतीय समाजबांधव अत्यंत शांततेत, श्रद्धेने आणि धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा करतात. यंदाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राहील, याची दक्षता घेतली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. घाटांवर रेषा आखणे, नावे लिहिणे किंवा इतरांना गैरसोय होईल असे कृत्य करणे आम्हालाही मान्य नाही. ज्यांनी हा प्रकार केला असेल त्यांनीही सार्वजनिक ठिकाणांचा आदर राखावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
समाजबांधवांना आवाहन करताना गुप्ता म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी पडू नका. घाटांवर स्वच्छता राखा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि धार्मिक उत्सव साजरा करताना इतरांच्या भावनांचाही आदर करा. छटपूजा हा श्रद्धेचा आणि निसर्गोपासनेचा उत्सव आहे. त्यामुळे त्याला राजकीय किंवा प्रादेशिक वादाचे स्वरूप न देता सर्वांनी एकोप्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यंदा छटपूजा १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान साजरी होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply