मुंबईतील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांत प्रमुख ठिकाणी २५ डिजिटल एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत. या स्क्रीनवर कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे नियम, दंडात्मक कारवाई, सार्वजनिक आरोग्य तसेच महापालिकेच्या विविध योजनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. या कामासाठी महापालिका ७२ लाख ५७ हजार ७०८ रुपये खर्च करणार असून, स्थायी समितीने यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मुंबई क्लीन लीग मोहिमेचा भाग
महापालिकेने १७ मार्च २०२६ पासून मुंबई क्लीन लीग ही स्वच्छता स्पर्धा सुरू केली आहे. नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपनियम २०२५ची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून डिजिटल स्क्रीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्क्रीनवर मुंबई क्लीन लीगची माहिती, स्वच्छतेचे संदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी दंडात्मक कारवाई, प्रभागातील महत्त्वाच्या सूचना आणि नागरिकांसाठी उपलब्ध सेवांची माहिती दाखवण्यात येईल. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून सविस्तर माहिती आणि तक्रार नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply