गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात जलसुरक्षेसाठी ३० कोटींचा कृती आराखडा तयार

ठाणे प्रशासनाने २०२६-२७ साठी ३० कोटींचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. पाच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये टँकर व विहिरींद्वारे पाणीपुरवठा सक्षम होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात जलसुरक्षेसाठी ३० कोटींचा कृती आराखडा तयार

उन्हाळ्यात ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन २०२६-२७ साठी सुमारे ३० कोटींचा टंचाई निवारण कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूरमधील गाव-पाड्यांमध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था सक्षम करण्यासाठी सात प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, नव्या विहिरींची निर्मिती आणि नळपाणी योजनांची दुरुस्ती यावर यंदा प्रशासनाने भर दिला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. अनेक गावांमध्ये विहिरींची पाणीपातळी खालावते, तर काही पाड्यांमध्ये नळयोजना असूनही तांत्रिक बिघाड आणि अपुऱ्या जलस्रोतांमुळे पाणीपुरवठा विस्कळित होतो. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.

३४८ गाव-पाड्यांना टँकरने पाणी

या आराखड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वाधिक कामे प्रस्तावित आहेत. पाच तालुक्यांतील एकूण ३४८ गाव-पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे चार कोटी ४२ लाख ७५ हजारांची तरतूद प्रस्तावित आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरवर्षी शहापूर आणि मुरबाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते, तर मागील वर्षी अंबरनाथमध्ये काही गावपाड्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. त्यामुळे यंदा संभाव्य ४३८ गावपाड्यांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये नव्याने अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडीतील गावांचा समावेश आहे.

पहिल्यांदाच विहिरींचे खोलीकरण

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढण्याची ६० कामे प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी ५५ कामांचा समावेश आहे. विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातूनही पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नवीन विंधन विहिरींच्या निर्मितीसाठी ५८६ कामे प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे पाच कोटी २७ लाख ५० हजारांचा अंदाजित खर्च आहे. तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनांसाठी १०२ कामे प्रस्तावित, तर पाणीपुरवठ्याचे उपलब्ध स्रोत अधिक सक्षम करण्यासाठी स्रोत बळकटीकरणाची १५१ कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची ९१ कामे प्रस्तावित आहेत. केवळ टँकरवर अवलंबून न राहता गावागावातील जलस्रोत सक्षम करण्याचा प्रयत्न या आराखड्यातून करण्यात आला आहे.

शहापूरमध्ये सर्वाधिक कामे

शहापूर तालुक्यासाठी सर्वाधिक ६०१ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याखालोखाल भिवंडी तालुक्यात २७२, मुरबाडमध्ये २०३, अंबरनाथमध्ये १७६ आणि कल्याण तालुक्यात १७१ कामे प्रस्तावित आहेत. विशेषतः शहापूरमधील दुर्गम वाड्या-पाड्यांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या लक्षात घेता या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. नवीन विंधन विहिरींच्या संख्येतही शहापूर १४० सह आघाडीवर असून, कल्याणमध्ये १२५, अंबरनाथमध्ये ८९, भिवंडीमध्ये ८८ आणि मुरबाडमध्ये ७४ विहिरी प्रस्तावित आहेत. संभाव्य टंचाईचे पाडे शहापूरमध्ये ३२५, भिवंडीमध्ये ५४, मुरबाडमध्ये २५, कल्याणमध्ये २० आणि अंबरनाथमध्ये १४ आहेत.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance