मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीचा म्हाडा समूह पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार म्हाडाने येथील सर्व १७ इमारती रिकाम्या करतानाच पाडकाम हाती घेतले आहे. पाडकाम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने चार ते सहा महिन्यांत प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. फनेल झोनमुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने रहिवाशांसाठी १७ मजली सहा इमारती उभारल्या जाणार आहेत, तर दोन मजले बेसमेंट असणार आहेत.
१५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न
जोगेश्वरी पूर्व येथील सुमारे सात एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या पूनमनगर परिसरातील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित होता. १९९० च्या दशकात उभारण्यात आलेल्या तळ अधिक चार मजल्यांच्या १७ इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत होत्या. यामध्ये १८० चौरस फुटांच्या ९४२ निवासी सदनिका तसेच ४२ अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे. रहिवाशांच्या मागणीनंतर आणि राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडाने हा पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला आहे.
म्हाडाने संबंधित रहिवाशांना मासिक २० हजार रुपये भाडे किंवा संक्रमण सदनिकांचा पर्याय ठेवला होता. मात्र, सुमारे २० रहिवाशांनीच संक्रमण सदनिकांचा पर्याय स्वीकारला असून, उर्वरित रहिवाशांनी भाड्याला पसंती दिली. त्यांना सुरुवातीला तीन महिन्यांचे आणि नंतर ३३ महिन्यांचे भाडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित १० इमारतींचे पाडकाम वेगात सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे.
असा असेल प्रकल्प
सुमारे २७,६२५ चौरस मीटर (सात एकर) क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, एकूण बांधकाम क्षेत्रफळ १,२१,८८९ चौरस मीटर आहे. यामध्ये ४५,७०८ चौरस मीटर पुनर्वसन घटकासाठी, तर ७६,१८१ चौरस मीटर विक्री घटकासाठी क्षेत्रफळ आहे. रहिवाशांना सध्या अस्तित्वात असलेल्या १८० चौरस फुटांच्या सदनिकांऐवजी ४४८ चौरस फुटांच्या सुसज्ज सदनिका मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी ८९३ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून, म्हाडाला सुमारे ६०० सदनिका उपलब्ध होऊ शकणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply